नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकार आणि लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (netflix) यांच्यात महत्त्वाची भागीदारी झाली आहे. त्यानुसार नेटफ्लिक्सवरुन देशातील सात प्रभावशाली आणि कर्तृत्ववान महिलांची माहिती अल्पकालीन व्हिडीओद्वारे देशवासियांना करुन दिली जाणार आहे. भारताच्या स्वातंत्र्याला आता 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त हा व्हिडीओ कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
अशा प्रकारचे आणखी अनेक व्हिडीओ पुढील 15 ऑगस्टपर्यंत प्रसारित पेले जातील. ‘आझादीकी अमृत कहानियाँ’ या मालिकेअंतर्गत हे प्रसारण होणार आहे. याशिवाय भारताच्या प्रगतीसंबंधातील विविध विषयांवरील 25 अल्पकालीन व्हिडीओज तयार करुन ते प्रसारित केले जातील. स्वातंत्र्यसंग्रामासंबंधीची एक मालिकाही प्रसारित करण्याची योजना आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
अनुराग ठाकूर यांची माहिती
या भागीदाराची माहिती केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून देण्यात आली. भारताची गौरवशाली वाटचाल दर्शविणारे 25 अल्पकालीन व्हिडीओज निर्माण करण्याचे कार्य नेटफ्लिक्सकडे सोपविण्यात आले आहे. हा भागीदारी करार अनुराग ठाकूर आणि नेटफ्लिक्सच्या ग्लोबल टेलिव्हिजनच्या प्रमुख बेला बजारिया यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
कर्तृत्ववान महिलांची उपस्थिती
पाच दिवसांमध्ये दोनदा एव्हरेस्ट सर करणाऱया एकमेव महिला अंशू जामसेनपा, पिठोरागडच्या पर्यावरण संरक्षणकर्त्या बसंती देवी, भारताच्या प्रथम अग्निशमन महिला कर्मचारी हर्षिणी कान्हेकर या कर्तृत्ववान महिलाही या प्रसंगी उपस्थित होत्या. त्यांच्यावरही व्हिडीओ बनविण्यात आले आहेत. या व्हिडीओंचे संपादन आणि सूत्रसंचालन नीना गुप्ता यांनी केले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. स्वातंत्र्यसंग्रामावरील मालिकेचे चित्रणही प्रगतीपथावर आहे.









