वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गुजरातमध्ये 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला 29 सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. गुजरातमधील विविध शहरांमध्ये या स्पर्धेतील क्रीडा प्रकार घेतले जाणार आहेत. ऍथलेटिक्स या क्रीडा प्रकारात देशातील विविध राज्यांचे अव्वल ऍथलिट्स सहभागी होणार असून स्टीपलचेसमध्ये सहभागी होणारा धावपटू अविनाश साबळे तसेच उंचउडी क्रीडा प्रकारात मुरली श्रीशंकर यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिहेरी उडीत सुवर्णपदक मिळविणारा एल्डहोस पॉल हे सहभागी होणार नाहीत. तब्बल सात वर्षांनंतर ही स्पर्धा पुन्हा भरविली जात आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या भालाफेक क्रीडा प्रकारात कास्यपदक मिळविणारी उत्तर प्रदेशची महिला ऍथलिट अनु राणी तसेच आसाम व ओरिसाचे प्रतिनिधित्व करणाऱया महिला धावपटू हिमा दास आणि दुती चंद हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरतील.
केरळमध्ये 2015 साली झालेल्या 35 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दुती चंदने महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण तर 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत कास्यपदक मिळविले होते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पहिले पदक मिळविण्यासाठी हिमा दास आतुरलेली आहे. पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत आंतररेल्वे क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम करणारा आसामचा ए. बोरोगेन तसेच महिलांच्या 100 मीटर अडथळय़ांच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रम करणारी आंध्रप्रदेशची महिला धावपटू ज्योती येराजी या स्पर्धेत सहभागी होत आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर हंगेरीत 2023 साली होणाऱया विश्व ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी भारतीय ऍथलिटला थेट पात्रता सिद्ध करता येईल.
29 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकार गुजरातच्या अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, बडोदा, राजकोट आणि भावनगर या शहरांमध्ये होणार आहेत. ऍथलेटिक्स हा क्रीडा प्रकार गांधीनगरच्या आयआयटी मैदानावर 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.









