वार्ताहर /येळ्ळूर
सहकार चळवळ मजबूत आणि सशक्त बनविण्यासाठी केंद्र सरकारचे सहकार खाते आणि राष्ट्रीय को-ऑप. युनियन ऑफ इंडिया ही संस्था प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून मल्टिस्टेट संस्थांच्या चेअरमन आणि संचालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये नवहिंद को-ऑप. सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर, व्हाईस चेअरमन अनिल हुंदरे, संचालक प्रदीप मुरकुटे, सी. बी. पाटील, शिवाजी सायनेकर, संभाजी कणबरकर, श्रीधर धामणेकर यांनी भाग घेतला होता.
दिल्ली येथे तीन दिवशीय कार्यशाळेत को-ऑप. आणि क्रेडिट सोसायटांच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. एनसीयूआयचे उपसंचालक कार्यशाळेच्या प्रशिक्षण प्रमुख दीप्ती यादव यांनी स्वागत करून उद्देश स्पष्ट केला. सहकार क्षेत्रामध्ये तज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यामध्ये अनंत दुबे यांनी ‘मूल्ये व सिद्धांत’ आणि सोशल मीडियावर मार्गदर्शन केले. संस्थेचे सभासद करून घेणे तसेच ते रद्द करणे याबाबतची माहिती व्ही. के. दुबे यांनी दिली.
सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळाची जबाबदारी कोणती, याचे मार्गदर्शन केले. आर्थिक नियोजन, जीएसटी व इतर करांचा को-ऑप. सोसायटीवर परिणाम, याची माहिती अनुराग यांनी दिली. यशांक कल्याणी यांनी को-ऑप. कायद्याची माहिती दिली. डॉ. राधिका महाजन यांनी प्रोजेक्ट प्लॅनिंगबद्दल पीपीटी दिले. प्राचार्य एस. सी. प्रधान यांनी आयटी तंत्रज्ञानाच्या उपयोगाची माहिती दिली. कार्यशाळेदरम्यान इफ्को खत कंपनीला भेट देण्यात आली. सदर कार्यशाळेत महाराष्ट्र, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, आसाम, केरळ, तामिळनाडू, नागालँड, अरुणाचल प्रदेश, हरियाणा आदी राज्यांतील मल्टिस्टेट सोसायट्यांचे 75 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.









