काणकोण : पर्तगाळी मठाधीश प. पू. श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांनी पर्तगाळी मठाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामाचा शिलान्यास पर्तगाळी मठ समितीचे पदाधिकारी त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते करून दिव्यांगांप्रती प्रेम व आपुलकी व्यक्त करतानाच एक नवा आदर्श घालून दिला. पर्तगाळी मठ परंपरेतील श्रीमद् द्वारकानाथतीर्थ स्वामी महाराजांच्या 50 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून या मठातील श्री वीर विठ्ठल मंदिर आणि मठ वास्तूच्या दुसऱ्या टप्प्याचा शिलान्यास समारंभ यावेळी आयोजित करण्यात आला होता. तीन ठिकाणी विधिवत शिलान्यास आणि चार शिलांचे पूजन केल्यानंतर प. पू. स्वामीजींच्या उपस्थितीत आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार मान्यवरांच्या हस्ते त्याचप्रमाणे मोखर्ड येथील लोकविश्वास प्रतिष्ठानच्या दिव्यांगांसाठीच्या शाळेतील सात्विक शानभाग आणि इशान कामत या मुलांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात शिलान्यास करण्यात आला. यावेळी दिव्यांग मुलांना स्वामीजींनी प्रसाद वितरण केले व विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले. दिव्यांग मुलांसाठीच्या शाळेतील शिक्षिका अदिती भट आणि सल्लागार समितीचे शिरीष पै हेही उपस्थित होते. लोकसहभागातून सुरू असलेल्या लोकविश्वास प्रतिष्ठानच्या दिव्यांग मुलांसाठीच्या शाळेतील विद्यार्थ्यांप्रती पर्तगाळी मठाधीशांनी जे प्रेम आणि आपुलकी दाखविली आहे त्याबद्ल ही संस्था सदैव स्वामीजींच्या ऋणात असेल. स्वामीजींच्या या कृतीने या संस्थेत काम करणाऱ्या संर्वांनाच एक प्रकारचे प्रोत्साहन मिळाले आहे, अशा शब्दांत लोकविश्वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुप प्रियोळकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
Previous Articleमडगावात शिगमोत्सवाची जोरदार तयारी
Next Article समाजकार्यकर्ती रेवती यांचा असोळणे येथे सत्कार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









