प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना – परिसंवाद आणि जनजागृती मेळावा
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
स्वतःच्या सन्मान, सामर्थ्य आणि समृद्धीसाठी जास्तीत जास्त विश्वकर्मींनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी विश्वकर्मींना केले.
जिल्ह्यात सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना परिसंवाद आणि जनजागृती मेळावा या कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या पारंपारिक कारागीर आणि कलाकारांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पीएम विश्वकर्मा ही योजना तयार केली गेली आहे. ही योजना 18 प्रकारच्या पारंपारिक कारागीर व कलाकारांसाठी असून पुरवठा साखळी वाढवणे, ती बळकट करणे, आणि विशिष्ट उत्पादने आणि सेवांची मागणी वाढवून लाखो भारतवासीयांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे . अशी माहिती यावेळी नारायण राणे यांनी उपस्थित विश्वकर्मींना दिली .
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशोर तावडे, डॉ.रजनीश, अतिरिक्त सचिव तथा विकास आयुक्त एमएसएमई,श्रीमती आर. विमला अनुजा बापट, डेप्युटी डायरेक्टर जनरल, डीसी एमएसएमई आदी मान्यवर उपस्थित होते. वरिष्ठ अधिकारी आणि विविध क्षेत्रातील तज्ञ यांनी यावेळी विश्वकर्मींना मार्गदर्शन केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक 12 बलुतेदार विश्वकर्मी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात सुतार तसेच नाभिक समाजातील प्रतिनिधींचे प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आले.
श्री राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून या योजनेची घोषणा केली होती. ज्यांनी आपल्या हातांनी आणि साधनांनी राष्ट्र उभारणीच्या कार्यात काम केले आहे, त्या आपल्या पारंपारिक आणि कुशल कारागिरांना न्याय्य सहाय्य प्रदान करण्यासाठी या योजनेला 13,000 कोटींचा अर्थसंकल्पीय निधी दिला गेला आहे. या योजनेच्या माध्यमातून परंपरागत विविध क्षेत्रातील कारागिराचे काम करणाऱ्यांना प्रशिक्षण, प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे विश्वकर्मा म्हणून ओळख मिळणार. मूलभूत तसेच प्रगत प्रशिक्षण विद्या वेतनासह मिळणार आहे. टूलकिट उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच अल्प व्याजदरात कर्ज देखील मिळणार आहे असे ते म्हणाले, आजच्या कार्यक्रम स्थळी विश्वकर्मी कारागीर व कलाकारांची पीएम विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी करण्यात आली .जिल्हाधिकारी श्री. तावडे म्हणाले, विश्वकर्मा योजना ही महत्वाकांक्षी योजना आहे. ही येाजना लाभार्थीपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करणार. जिल्हा उद्योग केंद्रामध्ये या योजनेसाठी स्वतंत्र मदत कक्ष उभारणार आहोत. तरी जिल्ह्यातील लाभार्थीनी मोठ्यासंख्येने नोंदणी प्रक्रिया पुर्ण करण्याचे आवाहनही जिल्हधिकाऱ्यांनी यावेळी केले.









