म. ए. समिती कार्यकर्त्यांचे गावागावांत जनजागृती फेरीवेळी आवाहन : बेकिनकेरे, अतिवाड, बसुर्ते, कोनेवाडी, बाची भागामध्ये जागृती फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
वार्ताहर/उचगाव
मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्याची जबाबदारी तमाम मराठी बांधवांची आहे. त्यामुळे फक्त समितीच्याच कार्यकर्त्यांनी नव्हेतर या भागातील प्रत्येक मराठी भाषिकाने कन्नडसक्ती विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. त्यामुळे या भागातील सर्व नागरिकांनी, ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी बसुर्ते येथील बैठकीत समिती कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.
मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी कन्नडसक्ती विरोधात आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाबाबत या परिसरात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी झंझावाती दौरा केला आणि या भागातील सर्व नागरिकांना मराठी भाषा आणि आपणावर होत असलेली कन्नडसक्ती याबाबत सर्वांना समजावून सांगून या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
मराठीच्या रक्षणासाठी या भागातील बेकिनकेरे, अतिवाड, बसुर्ते, कोनेवाडी, बाची या भागामध्ये झंजावती दौरा करण्यात आला. यावेळी या सर्व गावातून उत्स्फूर्त पाठिंबा नागरिकांनी दर्शविला असून मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आम्ही सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. माजी आमदार मनोहर किणेकर, म. ए. समितीचे युवानेते आर. एम. चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आणि समितीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गावागावांमध्ये जाऊन भेटी घेऊन या मोर्चासंदर्भात माहिती दिली.
मण्णूर-आंबेवाडी येथील ग्रामस्थांचा मोर्चाला जाहीर पाठिंबा
कर्नाटक सरकारने सीमाभागात कन्नडसक्तीचा अंमल जोराने चालू केल्याने त्याच्या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवार दि. 11 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. सदर मोर्चाला आंबेवाडी व मण्णूर येथील नागरिकांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या मोर्चासंदर्भात जागृती करण्यासाठी म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी दोन्ही गावात समिती कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे. जागृती संदर्भात मनोगत व्यक्त करताना प्रत्येक घराघरातून मराठी भाषिकांनी या मोर्चात सहभागी व्हावे व सरकारला मराठीची वज्रमूठ दाखवून द्यावी, असे सांगितले. ही जागृती सभा गुरुवार दि. 7 रोजी संध्याकाळी दोन्ही गावातून घेण्यात आली.
मण्णूर येथील जागृती सभेला आंबेवाडी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष चेतन पाटील, एल. के. कालकुंद्री, निवृत्त मुख्याध्यापक कृष्णा चौगुले, एस. आर. कालकुंद्री, भरमा चौगुले, मधु चौगुले, ग्रा. पं. सदस्य, संदीप डोणकरी, कल्लाप्पा अष्टेकर, यल्लाप्पा चलवेटकर यांचा सहभाग होता. आंबेवाडी येथील सभेला ता. पं. माजी सदस्य शिवाजी राक्षे, कमल मनोळकर तसेच अनिल शहापूरकर, मनोहर मनोळकर, नागराज तरळे, बाळू काटकर, कल्लाप्पा मनोळकर, श्रीकांत काटकर, मारुती काटकर यांचा सहभाग होता. यावेळी गावातील घरोघरी पत्रके वाटून मोर्चा संदर्भात जागृती केली व हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी केले. दोन्ही ठिकाणच्या जागृती सभेला ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









