घाणीचे साम्राज्य जैसे थे : समस्येचे निवारण करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध ठिकाणी असलेल्या रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाशेजारी सर्व्हीस रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. धारवाड रोड येथील शिवाजी महाराज उड्डाणपुलाशेजारील दुकानामध्ये पाणी शिरल्याने जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेऊन कामाला सुरुवात करण्यात आली. पण केवळ पाण्याचा निचरा झाला आहे. मात्र घाणीचे साम्राज्य जैसेथे असून, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
नव्याने उभारण्यात येत असलेल्या तिसऱया रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र उड्डाणपुला शेजारील रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. तसेच धारवाड रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुला शेजारील सर्व्हीस रस्त्याचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. येथील गटारीचे बांधकाम करण्यात आले नसल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारापासून लेंडीनाल्यापर्यंतच्या नाल्याचे बांधकाम करण्यात आले. तसेच मध्यवर्ती बसस्थानक ते रेल्वे ट्रकपर्यंतच्या नाल्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र रेल्वे ट्रकपासून रूपाली थीएटरपर्यंतच्या नाल्याचे बांधकाम करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथे असलेला नाला कचऱयाने तुडुंब भरला असून, सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी सुरू असलेल्या पावसामुळे सांडपाणी साचून परिसरातील दुकानांमध्ये शिरले आहे.
त्यामुळे व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. याबाबत व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे धाव घेऊन निवेदन सादर केले होते. याची दखल घेऊन महापालिकेच्या अभियंत्यांनी कार्यतत्परता दाखविली. येथील नाल्यामध्ये साचलेला कचरा काढून सांडपाणी वाहण्याचा मार्ग मोकळा केला. पण परिसरात अस्वच्छता जैसेथे आहे. दुकानांसमोर सांडपाणी साचत असून, येथील नाल्याच्या बांधकामाबरोबरच रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. सध्या या रस्त्याची दुर्दशा झाली असून, पायी चालत जाणेदेखील मुश्किल बनले आहे. त्यामुळे येथील समस्यांचे निवारण कधी होणार, असा प्रश्न व्यावसायिक व वाहनधारक करीत आहेत.









