ग्रामसभेत नागरिकांनी पंचायत मंडळाला धरले धारेवर
प्रतिनिधी / मोरजी
मोरजी, मांद्रे, हरमल या किनारी भागाप्रमाणे पार्से येथील जमिनी परप्रांतीयांना विकण्यास पार्से येथील ग्रामसभेत नागरिकांनी तीव्र विरोध केला. याविषयावरून पंचायत मंडळाला धारेवर धरले. गावातील डोंगर माथ्यावरील जमिनी विक्रीसाठी हालचाली सुरू असल्याचे यावेळी काही नागरिकांनी पंचायत मंडळाच्या लक्षात आणून दिले. त्यावर पंचायतीने वेळीच खबरदारी घेऊन जमीन विक्रीचा प्रकार रोखावा. अन्यथा जमीन विक्रीला आम्ही प्राणपणाने विरोध करू, असे सांगितले.
सरपंच अजय कळंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या ग्रामसभेला उपसरपंच रेश्मा कांबळी, प्रज्ञा पार्सेकर, नवनिर्वाचित पंच अजित मोरजकर, स्वप्नील नाईक, सुनीता बुगडे, मधुसूदन सातार्डेकर, पंचायत सचिव विजय तिळवे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी पंचायत सचिव विजय तिळवे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. सर्वप्रथम सरपंच अजय कलंगुटकर यांनी उपस्थित नागरिकांचे स्वागत करून विविध सरकारी योजनांची माहिती दिली.
यावेळी विषयांवर चर्चा झाली. नागरिकांनी खाजनगुंडा बांधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे पंचायतीच्या निदर्शनास आणून दिले. या मानशीची समिती अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. खाजन गुंडा बांधाऱ्याचे सुशोभीकरण झाल्यानंतर या ठिकाणची मासेमारी पूर्णपणे बंद पडली आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेला लाखो ऊपयांचे नुकसान होत आहे. मामलेदारांनी यात लक्ष घालून खाजन गुंडा बांध समिती निवडावी, अशी मागणी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली. यावर सरपंच कलंगुटकर यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिली.
भूमिगत वीजतारा घालण्यासाठी खोदण्यात आलेले रस्ते दुऊस्त न केल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागते. नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खाते, वीज खात्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करित बेजबाबदार कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यापुढे पाणीपुरवठा खात्याकडून जलवाहिन्या टाकण्यासाठी पुन्हा रस्ता खोडण्यात येणार असल्याने त्यांना पंचायतीने ना हरकत दाखला देऊ नये अशी सूचना करण्यात आली. यावेळी रवींद्रनाथ होळकर, दिलीप होळकर, गुरुदास पांडे, आनंद केरकर, प्रदीप देसाई, उल्हास आरोलकर, भानुदास साळगांवकर, अऊण पार्सेकर, रोहिदास आरोलकर, तुलसीदास म्हालदार, केशव बुगडे, प्रदीप देसाई, लाडू पोळजी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. यावेळी विविध ठरव मंजूर करण्यात आले. उपसरपंच रेश्मा कांबळी यांनी आभार मानले.









