पर्रा मुळ गावात पर्रीकरांची जयंती साजरी
प्रतिनिधी / म्हापसा
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी राज्यात दिलेले योगदान न विसरण्याजोगे आहे. बार्देश तालुक्यातील पर्रा गावासाठी स्व. पर्रीकरांचे योगदान महत्त्वाचे आहे. शिवाय पर्रा गावात कायमस्वऊपी स्व. पर्रीकर यांची जयंती साजरी करण्यात येईल असे सांगून स्व. मनोहर पर्रीकर यांचे दायित्व आणि वारसा भावी पिढीसाठी राखून ठेवण्याच्या हेतूने पर्रा येथे वर्षभरातच वाचनालय अथवा शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित वारसास्थळ उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी दिले.
बार्देशातील पर्रा येथे मंगळवारी मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीनिमित्ताने पर्रा पंचायत आणि कळंगूट व शिवोली मतदारसंघ निहाय आयोजित विशेष कार्यक्रमात आमदार मायकल लोबो बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो, विजय पर्रीकर (पर्रीकरांचे चुलत बंधु), पर्राचे सरपंच चंदानंद हरमलकर, उपसरपंच डेनियल लोबो, कळंगुटच्या उपसरपंच गीता परब, वेर्ला- काणकाच्या सरपंच दीपाली बिचोलकर, कळंगूट भाजपा अध्यक्ष यशवंत कांदोळकर, शिवोली भाजपा मंडळाचे अध्यक्ष मोहन दाभाळे, माजी उत्तर गोवा झेडपी उपाध्यक्ष वासुदेव कोरगांवकर, गुऊदास शिरोडकर, सुदेश शिरोडकर, उत्तर गोवा भाजपा जिल्हा सदस्य माही सिमेपुऊषकर, कांदोळी पंच धमेंद्र कांदोळकर, आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान मनोहर पर्रीकर हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. त्यांचे बोट धरून राजकारणात पुढे आलेल्या अनेकांपैकी आपण सुद्धा एक असल्याचे आमदार लोबो यांनी यावेळी सांगितले. स्व. मनोहर पर्रीकर हे गोव्याबद्दल दुरदृष्टी असलेले लोकनेते होते. त्यांच्यामुळेच आज भाजपा घराघरात पोहोचल्याचे शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी सांगितले. कळंगुटचे ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते गुऊदास शिरोडकर तसेच सुदेश शिरोडकर यांनी मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. मनोहर भाई पर्रीकर असे नामकरण करून सरकारने त्यांचा यथोचित बहुमान केल्याचे सांगितले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गोरख मांद्रेकर यांनी केले.









