विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार पुरविणाऱ्या अत्याधुनिक स्वयंपाक घराचे पिळर्ण येथे उद्घाटन
पणजी : माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या पुण्यतिथीदिनी मुलांना पौष्टिक मध्यान्ह भोजन देण्याचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरताना पाहून मला खूप आनंद होत आहे. जवळजवळ एका दशकापूर्वी ‘अक्षय पात्र’ला गोव्यात आमंत्रित करण्यास पर्रीकर यांनी पुढाकार घेतला पुढाकार होता आणि 2013-14 मध्ये सुरू झालेल्या प्रयत्नांना आज यश आले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. ‘अक्षय पात्र’ने गोव्यात शाळकरी मुलांना मध्यान्ह आहार पुरवण्यासाठी पिळर्ण औद्योगिक वसाहतीत सुरू केलेल्या अत्याधुनिक स्वयंपाकगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते सोमवारी पिळर्ण येथे झाले. साळगावचे आमदार केदार नाईक, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गित्ते, अक्षय पात्रचे सहसंस्थापक आणि उपाध्यक्ष चंचलपती दासा, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने सीएसआरचे वरिष्ठ प्रमुख सुभाष चंद्र राय, अक्षय पात्रचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विश्वस्त भरतर्षभ दासा, संचालक श्रीधर वेंकट उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, या स्वयंपाकगृहासाठी गोवा सरकारने 15,000 चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली आहे. 5,000 मुलांसाठी येथे मध्यान्ह आहार शिजवून वितरित करण्याची क्षमता आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आवश्यक स्वयंपाकघर पायाभूत सुविधांसह मदत केली आहे. अक्षय पात्र संस्था सुरूवातीला भारत सरकारच्या प्रमुख शालेय आहार कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान पोषण अभियानाचा भाग म्हणून राज्यातील 2,500 मुलांना आहार देईल. या वर्षापासून इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनाही मध्यान्ह आहार दिला जाईल. साळगाव, कळंगुट आणि शिवोली मतदारसंघातील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे भाग्य लाभले आहे. त्यामुळे आता आणखी चांगले शैक्षणिक निकाल मिळण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान पोषण अभियानांतर्गत हा कार्यक्रम राबवत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एनपीसीआयचे प्रवत्ते म्हणाले, सीएसआर उपक्रमांतर्गत गोव्यात पहिल्या अक्षय पात्र स्वयंपाकघराच्या स्थापनेला पाठिंबा देताना आम्हाला अत्यानंद होत आहे. अक्षय पात्र फाऊंडेशनचे संस्थापक दासा म्हणाले की, गोव्यात आमच्या पहिल्या स्वयंपाकघराचे लाँचिंग हा अक्षय पात्रच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी मुख्यमंत्री सावंत आणि गोवा सरकारचे आम्ही मनापासून आभारी आहोत. पीएम पोषण कार्यक्रमाचा हेतू शाळेतील प्रवेश आणि उपस्थिती वाढवणे तसेच पोषण वाढवणे आणि शिकण्याची क्षमता वाढवणे हा आहे. चंचलपती दासा म्हणाले, गोव्यात आमच्या पहिल्या स्वयंपाकघराचे उद्घाटन केल्याबद्दल आणि आम्हाला स्वयंपाकघर सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आभारी आहोत.
स्वयंसहाय गटांनी चांगल्या दर्जाचे अन्न द्यावे : मुख्यमंत्री
सरकारने भविष्यात तुरूंग आणि ऊग्णालयांमध्ये ‘अक्षयपात्र’चे अन्न पुरवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अक्षय पात्र सुरू केली असली तरी मध्यान्ह आहार पुरवणारे स्वयंसेवी गट बंद केले जाणार नाहीत. फक्त त्यांनी चांगल्या दर्जाचे अन्न द्यावे. मध्यान्ह आहारासाठी अक्षयपात्र सोबत सरकारची भागीदारी चालू राहील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.









