वृत्तसंस्था / रिने-रुहेर,इसेन (जर्मनी)
येथे सुरू असलेल्या विश्व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताचे तिरंदाजपटू परणीत कौर आणि कुशल दलाल यांनी मिश्र कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत भारतीय तिरंदाजपटूंनी एकूण 3 पदके मिळविली आहेत.
शुक्रवारी झालेल्या मिश्र कंपाऊंड तिरंदाजी प्रकारातील अंतिम लढतीत भारताच्या परणीत कौर आणि कुशल दलाल यांनी द. कोरियाच्या येरीन पार्क आणि सेंगयुएन पार्क यांचा 157-154 अशा गुण फरकाने पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या सांघिक प्रकारात मात्र कुशल दलालला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या सांघिक तिरंदाजी प्रकारात परणीत कौरने कांस्यपदक मिळविले.
मिश्र सांघिक तिरंदाजी प्रकारातील अंतिम लढतीत पहिल्या सत्रात दोन्ही स्पर्धकांनी 39-39 अशी बरोबरी साधली होती. त्यानंतर दुसऱ्या सत्राअखेर द. कोरियाने भारतावर 78-77 अशी केवळ एका गुणाची आघाडी मिळविली होती. त्यानंतर शेवटच्या सत्रामध्ये परणीत आणि दलाल यांनी पिछाडीवरुन मुसंडी मारत कोरियाचे आव्हान 157-154 असे संपुष्टात आणले.
महिलांच्या सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात भारताच्या परणीत कौर, अवनीत कौर, मधुरा धामणगावकर यांनी ब्रिटनवर 232-224 अशी मात केली. भारतीय महिला तिरंदाजपटूंनी या क्रीडा प्रकारात कांस्यपदक घेतले. पुरुषांच्या सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात भारताच्या कुशल दलाल, साहील जाधव आणि ऋतिक शर्मा यांचे सुवर्णपदक केवळ 1 गुणाने हुकले. भारतीय तिरंदाजपटूंना या क्रीडा प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. आता पुरुषांच्या वैयक्तिक प्रकारात कुशल दलाल आणि जाधव यांच्यात उपांत्य फेरीची लढत शनिवारी होणार आहे. तसेच महिलांच्या वैयक्तिक प्रकारात परणीत कौर आणि द. कोरियाची किम यांच्यात शनिवारी उपांत्य लढत होईल. या स्पर्धेत भारताला आणखी काही पदके मिळण्याची शक्यता आहे.









