गैरकृत्य करणाऱयांचे धाबे दणाणले : अन्य पार्लरांची ‘शटर्स डाऊन’च
प्रतिनिधी /म्हापसा
हणजूण येथील बासिल ट्रेडिशनल आयुर्वेदिक सेंटर या मसाज पार्लरवर हणजूण पोलिसांनी सोमवारी छापा टाकून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱयांकडे पाठविल्यानंतर उपजिल्हाधिकारी मामू हेगे यांनी बासिल मसाज पार्लर सिलबंद करण्याचा आदेश पोलिसांना दिला. त्यानुसार काल मंगळवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱयांनी पोलिसांसमवेत तेथे जाऊन हे मसाज पार्लर सिलबंद केले.
सोमवारी उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली हणजूण पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक विक्रम नाईक, उपनिरीक्षक तेजस कुमार यांनी छापा टाकून हे पार्लर चालविणाऱयास अटक केली असून पार्लरमधील खाटा, लोशन, वही आदी साहित्य जप्त केले आहे. पार्लरसाठी जागा भाडेपट्टीवर देणाऱयावरही पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
उशिरा का असेना, पण ही कारवाई करण्यात आल्यामुळे हणजूण गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांनी अशा कारवाई यापुढेही सुरूच ठेवाव्यात अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पा, पार्लर, डान्सबार आदी गैरकृत्ये बेकायदेशीरपणे चालवणाऱयांविरुद्ध पोलिसांना कारवाई करण्याचा आदेश दिला आहे, त्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे. ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.









