कास :
परळी येथील प्राचीन केदारेश्वर महादेव मंदिरास पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडून संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले असून याबाबत नुकतीच अधिसूचना जारी केली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय झाला असून या मंदिरास पुरातत्व विभागाकडून संरक्षित स्मारक म्हणून घोषित व्हावे, यासाठी आमदार शिवेंद्रराजे यांच्याकडे माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भैय्या भोसले यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे या अधिसूचनेमुळे या मंदिराचा जिर्णोद्धार तसेच हा परिसर सुशोभीकरण होत असल्यामुळे परळी पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण झाले असुन परळी ग्रामस्थांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले व राजु भोसले यांचा सत्कार करून आभार मानले.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले हे गेल्या कित्येक वर्षापासून या मंदिराचा कायापालट तसेच मंदिराचा जिर्णोद्धार व्हावा यासाठी पुरातत्त्व विभाग तसेच पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडे पाठपुरावा करत होते.
परळी येथील महादेव मंदिर हे इसवी सन १३/ १४ व्या शतकातील असून सदर मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ व सभामंडळ अशी आहे. गर्भगृह हे चार अर्थ स्तंभावर आहे. प्रवेशद्वारावर तीन शाखा असून पहिली शाखा पद्मपत्र व विविध प्राण्यांच्या नक्षीने कोरलेली आहे. दुसरी स्तंभ शाखा असून तिसरी बहुमितिक नक्षी असलेली शाखा आहे. ललाट बिंबावर गणेश मूर्ती असून उत्तरंग शिळेवर भौमितिक नक्षी आहे सभामंडळ १६ स्तंभावर असून त्यापैकी चार पूर्ण स्तंभ आहेत. मंदिरासमोर एक मानस्तंभ आहे. येथील एकूण एक हेक्टर ६१ आर क्षेत्र संरक्षित करावयाच्या स्मारकाचे क्षेत्रफळ म्हणून आखले आहे. सद्यस्थितीत हे मंदिर ग्रामपंचायत परळी अंतर्गत श्री केदारेश्वर देव टस्ट पहात आहे. या परिसरात अतिशय दुर्मिळ अशा वीरगळी असून सती शिळा आहेत. मात्र, त्याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी टस्ट निधी कमी पडत असल्याने येथील जिर्णोद्धार विकास ठप्प आहे. या शिवमंदिर स्थापत्य रचना अद्वितीय आहे.
- भाविकांसाठी ठरेल पर्वणी
परळी येथील प्राचीन महादेव मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाले आहे. या गोष्टीचा मनस्वी खूप आनंद होत आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार तसेच शेजारी असलेले पुष्करणी तलाव हा परिसर भाविक पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल राज्यभरातून शिवभक्त परळी येथे दर्शनासाठी येतील यात शंका नाही.
– मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले.
- पर्यटन वाढ व रोजगार उपलब्ध
मंत्री शिवेंद्रसिराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे या मंदिरास राज्य शासनाकडून संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. श्रावणातच आनंदाची बातमी मिळाली. परिसर विकासामुळे पर्यटन वाढीस चालना मिळेल. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील
– राजू भोसले, माजी जि.प. सदस्य








