काँग्रेस नेते राहुल गांधी प्रथमच गैरहजर राहण्याची शक्यता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी गुजरातमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या मतदानामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरऐवजी डिसेंबरमध्ये होणार असल्याचे समजते. संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होऊन 29 डिसेंबरपर्यंत सुरू राहू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याचदरम्यान काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये व्यग्र असल्यामुळे ते संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहण्याची शक्मयता कमी आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रा सोडणार नसल्याचे काँग्रेसचे प्रभारी महासचिव जयराम रमेश यांनी म्हटले आहे. ‘भारत जोडो’ यात्रेचा प्रवास ठरवलेले ध्येय पूर्ण करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कन्याकुमारीपासून सुरू झालेला हा प्रवास कर्नाटक, तेलंगणानंतर सध्या महाराष्ट्रात पोहोचला आहे.
नोव्हेंबरच्या तिसऱया आठवडय़ात सुरू होणारे संसदेचे अधिवेशन यावेळी गुजरात निवडणुकीमुळे उशिराने सुरू होणार आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात जुन्या संसद भवनात सुरू होऊन महिनाअखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्मयता आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राहुल गांधी सहभागी होणार असल्याची अटकळ होती आणि आता ते या अधिवेशनाला उपस्थित राहणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात अधिवेशन सुरू होण्याची शक्मयता आहे. गुजरात विधानसभेसाठी 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांतील मतमोजणी 8 डिसेंबरला होणार आहे.
12 राज्यांमधून जाणार भारत जोडो यात्रा
भारत जोडी यात्रा ही राजकारणापासून वेगळी असल्याचे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. आतापर्यंत हा प्रवास तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या चार राज्यांतून झाला आहे. हा यात्रा सध्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचली आहे. काँग्रेसची 3,750 किमीची भारत जोडो यात्रा 12 राज्यांमधून जाणार आहे. ही यात्रा दक्षिणेकडील कन्याकुमारी ते उत्तरेकडील काश्मीरपर्यंत 3,750 किमी अंतर कापेल. या प्रवासात काँग्रेसशिवाय इतर अनेक पक्षांच्या नेत्यांचाही पाठिंबा मिळाला आहे. या यात्रेत लाखो लोक सहभागी झाल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे.









