अर्थसंकल्पीय अधिवेशनाची समाप्ती, सर्वाधिक कामकाजाचा विक्रम, महत्वाची विधेयके संमत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले आहे. संसदेची दोन्ही सभागृहे अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आली आहेत. यावेळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विक्रमी कामकाजाची नोंद झाली असून अनेक महत्वाची विधेयके संमत करण्यात आली आहेत. या विधेयकांमध्ये 2025-2026 या वर्षाचा अर्थसंकल्प, वित्त विधेयक तसेच नव्या वक्फ विधेयकाचा समावेश आहे.
जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी या अधिवेशनाचा प्रारंभ करण्यात आला होता. 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. 4 एप्रिल या दिवशी अधिवेशनाची समाप्ती झाली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या सांगता वक्तव्याने अधिवेशनाचे सूप वाजल्याची घोषणा करण्यात आली. राज्यसभाही शुक्रवारीच संध्याकाळी संस्थगित करण्यात आली आहे.
कोणती विधेयके संमत…
या अधिवेशनात नवे वक्फ विधेयक, मुसलमान वक्फ रद्दबातल विधेयक, स्थलांतर आणि विदेशी नागरीक विधेयक, प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट इन एअरक्राफ्ट ऑब्जेक्टस् विधेयक, रिअॅडजेस्टमेंटस् ऑफ रिप्रेंझेटेशन ऑफ शेड्यूल ट्राईब्ज इन असेंब्ली कॉन्स्टीट्युएन्सीज इन गोवा विधेयक, त्रिभुवन सहकार विद्यापीठ विधेयक, आपत्कालीन व्यवस्थापन सुधारणा विधेयक, रेल्वे सुधारणा विधेयक, तेलक्षेत्र सुधारणा विधेयक, बँकिंग कायदा सुधारणा विधेयक, द बॉयलर्स विधेयक, वाहतूक लँडिंग विधेयक, समुद्री मालवाहतूक विधेयक, समुद्री नौकावाहतूक विधेयक आणि व्यापारी नौका वाहतूक विधेयक, अशीही विधेयके संमत करण्यात आली.
दोन सत्रांमध्ये अधिवेशन
हे अधिवेशन नेहमीच्या परंपरेनुसार दोन सत्रांमध्ये घेण्यात आले. प्रथम सत्र 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी असे होते. या काळात केंद्रीय अर्थसंकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. द्वितीय सत्र 10 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत घेण्यात आले. याच सत्रात बहुचर्चित नूतन वक्फ विधेयक संमत करण्यात आले आहे.
सर्वात ‘उत्पादक’ अधिवेशन
स्वतंत्र भारताच्या इतिहासात हे अधिवेनश सर्वाधिक उत्पादक ठरले आहे. या अधिवेशनाने अनेक नवे विक्रम निर्माण केले आहेत. राज्यसभेत वक्फ विधेयकावर सलग 17 तास 2 मिनिटे चर्चा झाली, जी आतापर्यंतच्या इतिहासातील एका विषयावरची सर्वात प्रदीर्घ चर्चा आहे. या चर्चेने 1981 चा 15 तास 51 मिनिटांचा विक्रम मागे टाकला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी शुक्रवारी सदनाचे सत्रावसान झाल्यानंतर पत्रकारांना दिली आहे.
169 सदस्यांचा सहभाग
अर्थसंकल्पावरील चर्चेत दोन्ही सदनांच्या मिळून 169 सदस्यांचा सहभाग होता. तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेत दोन्ही सभागृहांमधील मिळून 173 सदस्यांनी भाग घेतला. या अधिवेन काळात 10 सरकारी विधेयकांचे पुनर्सादरीकरण करण्यात आले. याखेरीज या अधिवेशनाच्या प्रश्नतासांमध्ये एकंदर 202 सदस्यांनी जनहिताचे प्रश्न उपस्थित केले. हा देखील एक विक्रमच ठरला आहे.
गोंधळाचे गालबोट
अधिवेशनाच्या अंतिम दिनी विरोधी पक्षांनी केलेल्या गोंधळाचे गालबोट या अधिवेशनाला लागले आहे. राज्यसभा सदस्य सोनिया गांधी यांनी वादग्रस्त विधान केले. वक्फ विधेयक चर्चा न करताच घाईघाईने संमत करण्यात आले, असे गांधी यांचे म्हणणे होते. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याने चिडलेल्या काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला. तथापि, लोकसभा अध्यक्षांनी आपले सांगता वक्तव्य पूर्ण केले आणि अधिवेशनाची समाप्ती झाली.









