वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सुरक्षा कवचाचा भेद करून लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या सहा पैकी पाच आरोपींची पॉलिग्राफ चाचणी केली जाणार आहे. ब्रेन मॅपिंग आणि नार्को अॅनालिसिस असे या चाचणीचे स्वरुप असेल. या पाच आरोपींनी या चाचणीला संमती दिली आहे. मात्र, सहावी आरोपी नीलम आझाद हिने संमती दिलेली नाही.
13 डिसेंबर 2024 या दिवशी ही घुसखोरी झाली होती. या सहा आरोपींपैकी दोघांनी प्रेक्षकांच्या सज्जातून खांबावरून उतरून सभागृहात प्रवेश केला होता आणि धुराची नळकांडी सोडली होती. यावेळी लोकसभेची कारवाई सुरू होती. या प्रकारामुळे काहीकाळ घबराट पसरली होती. अन्य दोन आरोपींनी संसद परिसराबाहेर धुराची नळकांडी फोडून घोषणाबाजी केली होती. या चार आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली होती. तर मुख्य सूत्रधार आणि अन्य आरोपीला दोन दिवसांच्या अंतराने अटक करण्यात आली होती. सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत.
पोलीस कोठडीत वाढ
शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. दिल्लीच्या कनिष्ठ न्यायालयाने आरोपींच्या पोलाrस कोठडीत 8 दिवसांची वाढ करण्याचा आदेश दिला. या वाढीची मागणी दिल्ली पोलिसांनी केली होती. ती मान्य करण्यात आली आहे. तसेच हे आरोपी तपासात सहकार्य करीत नसल्याने त्यांची पॉलिग्राफ चाचणी घेण्याची अनुमती पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली होती.
पाच आरोपींची संमती
कोणत्याही आरोपीची पॉलिग्राफ चाचणी घेण्यासाठी त्याची किंवा न्यायालयाची अनुमती आवश्यक असते. या प्रकरणातील मनोरंजन डी. सागर शर्मा, ललित झा, अमोल शिंदे आणि महेश कुमावत या पाच आरोपींनी अशा चाचणीला संमती दिली आहे. मात्र, नीलम आझाद या महिला आरोपीने मात्र ही चाचणी देण्यास नकार दिला आहे. या आरोपींचा पक्ष न्यायालयात मांडण्याचे काम कायदेशीर साहाय्याच्या माध्यमातून अमित शुक्ला हे वकील करीत आहेत.
शुक्लांकडून विचारणा
या आरोपींची पॉलिग्राफ चाचणी करण्याचे कारण काय असा प्रश्न शुक्ला यांनी न्यायालयात उपस्थित केला होता. त्यावर, तज्ञ समितीने तशी सूचना केली असून ती पोलिसांवर बंधनकारक आहे, असे उत्तर सरकारच्या वतीने देण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना संमतीसंबंधी विचारणा केली. त्यावेळी पाच आरोपींनी संमती असल्याचे स्पष्ट केले. आरोपींच्या वकिलांनी पोलीस कोठडी वाढविण्यास विरोध केला होता. मात्र, तो मान्य करण्यात आला नाही.
युएपीएतील तरतूद
बेकायदेशीर कृत्ये विरोधी कायद्यांतर्गत (युएपीए) 30 दिवसांच्या पोलीस कोठडीची तरतूद आहे, ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीत आठ दिवसांची वाढ करण्याचा आदेश दिला. नीलम आझाद या आरोपीची पॉलिग्राफ चाचणी करण्यासाठी आता पोलिसांना न्यायालयाची अनुमती घ्यावी लागणार असून ती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.









