‘राष्ट्रपत्नी’ वक्तव्यावरून भाजप सदस्य माफीनाम्यावर ठाम ः इराणींनी घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘राष्ट्रपत्नी’ वक्तव्यावरून शुक्रवारी भाजपने संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी या मागणीवर भाजप खासदार ठाम राहिल्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. दरम्यान, याच मुद्दय़ावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वतंत्रपणे भेट घेतली.
राष्ट्रपतींवरील वादग्रस्त विधानावरून झालेल्या गदारोळातच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सहकारी मंत्री डॉ. महेंद्र मुंजपारा आणि जॉन बारला यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. ही भेट सौहार्दपूर्ण असल्याचे स्पष्टीकरण इराणी यांनी दिले असले तरी ‘राष्ट्रपत्नी’ प्रकरणाचीच चर्चा या भेटीत झाल्याचा संशय प्रसारमाध्यमांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी वादग्रस्त विधान करणारे काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनीही गुरुवारी राष्ट्रपतींना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र, शुक्रवार सायंकाळपर्यंत दोघांचीही भेट झाली नव्हती. चौधरी यांनी ‘मी राष्ट्रपतींची माफी मागतो, ढोंगींची नाही’ असे वक्तव्य करून आगीत तेल ओतल्यामुळे भाजप नेते अधिकच संतापले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपतींनी अद्याप चौधरी यांना भेटीची वेळ दिलेली नाही.
निलंबित खासदारांचे आंदोलन मागे
संसदेत झालेल्या गदारोळावरून निलंबित करण्यात आलेल्या 27 खासदारांचे धरणेही शुक्रवारी संपले. बुधवारपासून सर्व निलंबित सदस्य गांधींच्या पुतळय़ासमोर आंदोलनाला बसले होते. धरणे संपताच संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी खासदार निदर्शनाच्या नावाखाली पार्टी करत होते, असा आरोप केला. महात्मा गांधीजींच्या पुतळय़ासमोर बसून मांसाहारी जेवण सेवन केल्याचा दावा जोशी यांनी केला.
भारतीयांचे रक्त वाचवा ः काँग्रेस
बुधवारपासून धरणे धरणाऱया खासदारांनी डास (मच्छर) हा मुद्दा बनवून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. ‘संसदेच्या संकुलात डास आहेत, पण विरोधी खासदार घाबरत नाहीत. भारतीयांचे रक्त वाचवा’, असे ट्विट काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी केले. डासांच्या त्रासाने त्रस्त झालेल्या खासदारांनी गुरुवारी रात्री आंदोलनस्थळी मच्छरदाणी लावून आणि क्वाईल पेटवून रात्र काढली.









