वृत्तसंस्था/नवी दिल्ली
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी विरोधकांच्या निषेधामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभर चालू शकले नाही. बिहार एसआयआरवर चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांनी केलेल्या गदारोळानंतर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दरम्यान, गुरुवारी लोकसभेत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक 2025 आणि राष्ट्रीय डोपिंग विरोधी (सुधारणा) विधेयक 2025 संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. विरोधकांनी दोन्ही विधेयके जेपीसीकडे पाठवण्याची मागणी केली आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांना पत्र लिहून बिहार एसआयआरवर चर्चा करण्याची मागणी केली होती. तथापि, एसआयआरवरील चर्चेबाबत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यापूर्वीच सरकारची बाजू स्पष्ट केलेली आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर सभागृहात चर्चा करता येत नसल्याचे म्हणणे सरकारने मांडले आहे. मात्र, विरोधक निवडणूक आयोगातील सुधारणांबाबत तरी सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी करत गोंधळ घालत असल्यामुळे संसदेचे कामकाज ठप्प झालेले दिसून येत आहे.









