उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांची अधिसूचना ; त्वरित अंमलबजावणीचा आदेश

प्रतिनिधी /वाळपई
वाळपई शहराच्या वाहतूक आराखडय़ाला अजून मंजुरी मिळाली नाही. यामुळे शहरात वाहतूक कोंडी सातत्याने सतावत आहे. याची दखल घेऊन उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हेगे यांनी वाळपई न्यायालय ते पोलीस स्थानकापर्यंतच्या रस्त्यावर वाहने पार्क करू नयेत, अशी अधिसूचना बुधवारी जारी केली. अधिसूचनेची त्व†िरत अंमलबजावणी करावी, असा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिला.
वाळपई न्यायालय ते शहरातील मध्यवर्ती भागापर्यंत दोन्ही बाजूने मोठय़ा प्रमाणात वाहने पार्क केली जातात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहनांना वाट मिळत नसल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत असते. खास करून दुपारच्या वेळी शाळा सुटल्यानंतर वाहतूक कोंडी होत असल्याने याकडे सरकारने लक्ष देण्याची पालकांनी केलेली मागणी वर्तमानपत्रातून प्रसिध्द झाली होती. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱयांनी सदर अधिसूचना जारी केली.
उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांनी वाळपई न्यायालय ते पोलीस स्थानक मार्गावर वाहने पार्किंग करण्यास प्रतिबंध करणारी अधिसूचना जारी केली. यामुळे नागरिकांनी व पालकांनी समाधान व्यक्त केले असून यामुळे शहरांमध्ये सकाळी व दुपारच्या वेळी होणारी वाहतुकीची कोंडी 50 टक्क्यांनी कमी होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. यामुळे जिल्हाधिकाऱयांचे आभार व्यक्त केले आहेत.
जिल्हाधिकाऱयांच्या आदेशामुळे वाहने पार्किंग होणार नसल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात येणार असल्याचे नगराध्यक्ष सेहझीन शेख यांनी जिल्हाधिकाऱयांच्या अधिसूचनेचे स्वागत केले.









