व्यापाऱ्यांमधून संताप : कारवाईची मागणी
बेळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात पार्किंगच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. खडेबाजार येथे रस्त्यावरच वाहने पार्किंग करण्याचे प्रकार सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. केवळ वाहतूक कोंडीच वाढत नाही तर आसपासच्या विक्रेत्यांनाही याचा फटका बसत असल्याने पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे. समादेवी मंदिरापासून हंस टॉकीज रोडपर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहने उभी केली जात आहेत. शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी तर वाहनांच्या रांगा लागत आहेत. या परिसरातील दोन ते तीन ठिकाणी पे अँड पार्कची व्यवस्था असतानाही रस्त्यावरच वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे इतर वाहने ये-जा करणे अवघड होत आहे.
दुकानांसमोर मोठी वाहने लावली जात असल्याने व्यापारीही वैतागले आहेत. कोणतीही विचारपूस न करता वाहन पार्किंग करून चालक निघून जातात. वाहनचालक येईपर्यंत व्यापाऱ्यांना वाट पहावी लागत आहे. बऱ्याच वेळा व्यापारी व वाहने पार्किंग करणाऱ्यांची वादावादी होत आहे. परंतु, तरीदेखील पार्किंग करण्याचे प्रकार सुरूच आहेत. रहदारी पोलिसांचे वाहन आले की तात्पुरत्या स्वरुपात वाहने बाजूला घेतली जातात. पुन्हा काही वेळानंतर जैसे थे परिस्थिती असल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्त्यावर वाहने पार्किंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.









