पार्किंग समस्या बनली नित्याची, शिस्त लावण्याची गरज
बेळगाव : जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात पार्किंगची समस्या नेहमीचीच आहे. सोमवारी तर सर्वत्र दुचाकी आणि चारचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे पार्किंग करण्यात आली होती. त्यामुळे वकिलांना ये-जा करणेही अवघड झाले होते. मुख्य म्हणजे जेएमएफसी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरच पार्किंग केले जात आहे. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या इमारतीत अनेक न्यायालये स्थलांतरीत करण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारापेक्षाही अधिक गर्दी जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात होत आहे. पक्षकार तसेच वकीलही दुचाकी तसेच चारचाकी वाहने पार्किंग करताना अडचणी निर्माण होत आहेत. पार्किंग केल्यानंतर न्यायालयात जातानाच अनेक दुचाकी पार्किंग केल्या जात असल्यामुळे घाईगडबडीत जाणे कठीण झाले आहे. सकाळी 10.30 च्या सुमारास न्यायालये सुरू होतात. त्यामुळे खटल्यासाठी त्याठिकाणी वकिलांना उपस्थिती दर्शवावी लागते. मात्र त्याचवेळी अडथळा निर्माण होत आहे, अशा तक्रारी वकिलांच्या वाढल्या आहेत. तेथे असलेला वॉचमनही बऱ्याचवेळा दुचाकीस्वारांना सूचना करत असतो. मात्र बऱ्याचवेळा त्या वॉचमनच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून दुचाकी व चारचाकी वाहने हवी तशी पार्किंग करून जात आहेत. त्यामुळे इतर दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनचालकांना त्याचा मोठा त्रास होत आहे. सध्या न्यायालये गजबजू लागली आहेत. सुटी संपल्यानंतर पूर्ण क्षमतेने कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे न्यायालयामध्ये खटल्याचे कामकाज तीव्रगतीने सुरू असून वकील व पक्षकारही मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत. त्यामुळे वाहनांची संख्या वाढू लागली आहे. परिणामी पार्किंगसाठी जागा कमी पडू लागली आहे. न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरच दुचाकी पार्किंग केल्यामुळे समस्या निर्माण होत आहे. बार असोसिएशनने याकडे लक्ष देवून संबंधितांना ताकीद करावी, अशी मागणी होत आहे.









