सरकारी कार्यालयांसमोरही शुल्क आकारणी
बेळगाव : रेल्वेस्टेशन-हेस्कॉम कार्यालयासमोर वाहने लावणाऱ्यांकडून पार्किंगचे पैसे वसूल केले जात आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डने कंत्राटदाराला या परिसराचे कंत्राट दिले असल्याने प्रत्येक वाहनाला 10 रुपये वसुली केली जात आहे. यामुळे कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे कंत्राटदार व नागरिकांमध्ये वादावादीचेही प्रकार होत आहेत. रेल्वेस्टेशन, कारवार बसस्टँड तसेच हेस्कॉम कार्यालय येथे दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते. बरेचजण स्टेशन रोडवर वाहने पार्किंग करून कार्यालयांमध्ये जातात. यापूर्वी वाहने लावल्यानंतर पार्किंगसाठी पैसे घेतले जात नव्हते. मागील दोन दिवसांपासून दुचाकीला 10 रुपये तर चारचाकीलाही शुल्क वसुली सुरू आहे. कॅन्टोन्मेंटकडून रितसर कंत्राट घेतल्यामुळे पार्किंगचे पैसे वसूल करत असल्याचे कंत्राटदार सांगत आहे. हेस्कॉम कार्यालयात जागा अपुरी असल्यामुळे बरेचशे नागरिक बाहेरच्या बाजूला वाहने पार्किंग करतात. प्रत्येक महिन्यात बिल भरण्यासाठी गर्दी होत असल्यामुळे जागाच उपलब्ध नसते. यामुळे बाहेर वाहने लावण्याशिवाय पर्याय नसतो. सरकारी कार्यालयांसमोरच वाहने लावण्यावर पार्किंग शुल्क आकारले जात असल्याने नाराजीचा सूर आहे.
हेस्कॉम, रेल्वेस्टेशन व कारवार बसस्टँडच्या समोर वाहने लावल्यास कंत्राटदाराकडून पार्किंग शुल्क घेण्यात येते. परंतु, त्याच भागात असणाऱ्या हॉटेल, दुकाने, बेकरीसमोर वाहने लावणाऱ्यांकडून मात्र शुल्क घेतले जात नसल्याचे दिसून आले. यामुळे हा दुजाभाव का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारी कार्यालयासमोर वाहने लावल्यावर पार्किंग शुल्क घेणारा कंत्राटदार दुकानांसमोर मात्र वाहने लावल्यावर शुल्क घेत नसल्याने याबाबत काही साटेलोटे आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.









