पार्किंगमध्ये वाहनधारकांकडून पैसे आकारणीसाठी दहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती
कोल्हापूर : महापलिकेचे सरस्वती टॉकीज येथील बहुमजली पार्किंग सोमवारपासून सुरु होत आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेसमेंटमध्ये 240 दुचाकी आणि 75 चारचाकी पार्किंग करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. पार्किंगमध्ये वाहनधारकांकडून पैसे आकारणीसाठी दहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
शहरात वाहनांच्या पार्किंगची समस्य गंभीर आहे. सर्किट बेंच सुरु झाल्यानंतर दसरा चौक येथील पार्किंग सकाळीच हाऊसफुल्ल होते. त्यामुळे वाहनधारकांना पार्किंगसाठी अन्य पर्याय शोधावे लागतात. शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविका कोल्हापुरात येतात.
याकाळात पार्किंगची समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे सरस्वती टॉकीज येथील बहुमजली पार्किंग नवरात्र उत्सवापुर्वी सुरु करण्याचे नियोजन महापालिकेचे होते. त्यानुसार तयारी पूर्ण झाली आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील निधीतून सरस्वती टॉकीजजवळील बहुमजली पार्किंगची इमारत उभी केली जात आहे. त्याला बऱ्याच अडचणी आल्या.
त्यातून पहिला टप्पा पूर्ण झाला. त्यामधील गाळे देण्याचे नियोजन केले होते. पण त्याबाबत अजूनही निश्चित झाले नसल्याने काम पूर्ण झालेले नाही. त्यातून पार्किंगची जागा अडून राहू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने या नवरात्रीमध्ये कोणत्याही परिस्थितीत बहुमजली पार्किंग सुरु करण्याचे ठरवले होते.
त्यानुसार येथे विजेची सोय, इतर सुविधा करण्यास सुरुवात केली. इमारतीत प्रवेश करण्यासाठी रस्ता, रॅम्प आवश्यक होता. दोन दिवसात ते काम मार्गी लावत प्रवेशमार्गावरील केबीन बाजूला लावल्या. फक्त बेसमेंटमध्ये जाण्यासाठीच्या मार्गाची तयारी केली जात आहे. हे ही काम लवकर पूर्ण होणार असून सोमवारपासून पार्किंग सुरु हाते आहे.
दहा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
पार्किंगमध्ये वाहनधारकांशी होणाऱ्या व्यवहाराबाबतचे प्रशिक्षण येथे नियुक्त दहा कर्मचाऱ्यांना दिले जात आहे. प्रशिक्षण पूर्ण करुन सोमवारपासून पूर्ण क्षमतेने पार्किंग सुरु केले जाणार आहे.
चारचाकींना तासाला 40 रुपये भाडे
बहुमजली पार्किंगमध्ये तळमजल्यावर 15 तर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर 60 चारचाकींच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे. अशा एकूण 75 चारचाकी येथे पार्क करता येणार आहेत. चारचाकींना तासाला 40 रुपये भाडे आकारणी केली जाणार आहे.
अमेरिकन बंगलोच्या जागेत 70 बसेसच्या पार्किंगची व्यवस्था
जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील अमेरिकन बंगलोच्या जागेत पार्किंगचे नियोजन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. याठिकाणी साफसफाईचे काम सुरु आहे. नवरात्रोत्सवात कोल्हापूरातील अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात.
अन्य शहरातून मोठ्या प्रमाणात वाहने येतात. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण पडतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वाहतुकीचे नियोजन केले जात आहे. अमेरिकन बंगलोच्या जागेत 60 ते 70 बससचे पार्किंग होऊ शकते. तसेच एस्तेर पॅटन, शंभर फुटी रोड आणि अन्य एका खासगी जागेत पार्किंगचे नियोजन आहे, असे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरेंनी सांगितले.








