पथदीपांच्या देखभालीकडे दुर्लक्ष ः दुरुस्तीची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
शहरातील विविध उद्यानांचा विकास करण्यासाठी आणि पथदीपांच्या देखभालीसाठी कोटीचा निधी खर्च केला जातो. मात्र उद्यानातील पथदीपांसह शहरातील निम्मे पथदीप बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे हनुमाननगर परिसरातील उद्यान अंधाराच्या विळख्यात सापडले आहे. पथदीपांसाठी इतका निधी खर्ची घालूनही देखभालीकडे दुर्लक्ष का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
उद्यानामध्ये हायमास्टसह विविध ठिकाणी पथदीप बसविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे विविध चौक आणि रस्त्याशेजारील पथदीपांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र बहुतांश ठिकाणी असलेले हायमास्ट बंद असून विशेषतः उद्यानातील दिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. हनुमाननगर परिसरात क्रीडा संकुलासह उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे हनुमान नगरसह विविध परिसरातील क्रीडापटू येथील मैदानामध्ये खेळाचा सराव करीत असतात. तसेच परिसरातील लहान मुलांसह वृद्ध नागरिक उद्यानामध्ये फिरण्यासाठी येत असतात. पण उद्यानात अंधार पसरल्याने गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. हनुमाननगर येथील उद्यानात केवळ एकच हायमास्ट सुरू असल्याने संपूर्ण उद्यानात अंधार पसरला आहे.
परिसरात झाडे झुडपे असल्याने सापाकिडय़ांचा वावर असतो. वृद्ध आणि लहान मुले या ठिकाणी येत असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने दक्षता घेणे आवश्यक आहे. पण याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. महापालिका आयुक्तांसह पथदीपांची देखभाल करणाऱया अधिकाऱयांनी याची दखल घेऊन उद्यानातील दिव्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी हनुमाननगर परिसरातील रहिवासी करीत आहेत.









