शुक्रवारी राज्यभरात सरासरी 6.50 इंच पाऊस : सांगे, केपे, कुंकळ्ळी, मडगाव, सांखळी, पेडणेत नद्यांना पूर,साळावली धरण ओव्हरफ्लो, आजही सर्वत्र मुसळधार
प्रतिनिधी /पणजी
मुसळधार पावसाने गोव्याला झोडपून काढले. शुक्रवारी पहाटे 1 वा. सुरु झालेला पाऊस दिवसभर चालूच होता. गेल्या 24 तासांत राज्यात सरासरी पावणे सात इंच पाऊस पडल्याने दोन दिवसांपूर्वी 5 वर्षांमध्ये तयार झालेला रेकॉर्ड पुन्हा मोडला आणि शुक्रवारी नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला. राज्याभरात आतापर्यंत सरासरी 60 इंच पावसाची विक्रमी नोंद झालेली आहे. गेल्या अनेक वर्षानंतर प्रथमच जुलैच्या दुसऱया आठवडय़ातच पावसाने एवढे उद्दिष्ट गाठले आहे. सांगेला पावसाने अक्षरशः झोडपून काढून 24 तासांत तिथे 9 इंच एवढी विक्रमी नोंद केली, तर केपेमध्ये गेल्या 24 तासांत 7.5 इंच पडलेल्या पावसाने यंदाच्या मौसमातील नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला असून तेथे या महिन्याभरात 82 इंच एवढा पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाने राज्यात सर्वत्र पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मान्सून आक्रमक बनल्याने राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडला आहे. सांगेमध्ये पावसाने कहर केला असून तिथे 9 इंच एवढी विक्रमी नोंद केली आहे. सांगे, केपे, पारोडा इत्यादी भागात सर्वत्र नद्यांना पूर आले आहेत. कित्येक घरांना पाण्याने वेढले आहे. बऱयाच ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. काही भागातील वाहतूक बंद पडली आहे. प्रशासनाने काही नागरिकांना सखल भागातून सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.
साळावली धरण ओव्हरफ्लो
सांगे येथील साळावली धरण ओतप्रोत भरुन वाहत आहे. सांगे व केपे या भागात यंदा पावसाने आक्रमक रुप धारण केलेले आहे. परिणामी या दोन्ही भागात पावसाची विक्रमी नोंद होत आहे. उत्तर गोव्याच्या तुलनेत यंदा दक्षिण गोव्यात विशेषतः सांगे व केपे भागात पावसाची विक्रमी नोंद होत आहे. केपेमध्ये यंदाच्या मौसमात आतापर्यंत 82 इंच एवढी पावसाची नोंद झालेली आहे तर सांगेमध्ये पावसाने इंचाची साठी गाठलेली आहे. राज्यात पावसाने कहर केलेला असून पुराने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे. दक्षिण गोव्याला त्याचा सर्वाधिक फटका बसलेला आहे.
नद्यांनी गाठली धोक्याची पातळी
पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. डोंगराळ भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने सत्तरीतील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत. सांखळीची वाळवंटी नदी देखील धोक्याच्या पातळीवर जाऊन पोहोचली आहे. पावसाचा जोर वाढला तर सांखळीत पुन्हा पूरस्थिती निर्माण होईल. सांगे व केपे भागात पुराने थैमान घातलेले आहे.
राज्यात सरासरी 6.50 इंच पावसाची विक्रमी नोंद झालेली आहे. सांगे, केपे व काणकोणमध्ये पावसाने कहर केला व तिथे पावसाचा जोर तसाच असल्याने हाहाकार माजण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दि. 12 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. त्याचबरोबर जोरदार वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ताशी 45 ते 65 किमी या वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने सर्वांनी आवश्यकती काळजी घ्यावी, असेही कळविले आहे. सध्या पडत असलेल्या विक्रमी पावसामुळे वार्षिक सरांसरीच्या तुलनेत 15 इंच जादा पाऊस पडलेला आहे. यंदा पाऊस नवा विक्रम गाठण्याच्या तयारीत आहे. गेल्या 24 तासांत उत्तर गोव्यात सरासरी 151.3 मिमी तर दक्षिण गोव्यात 180 मिमी पाऊस झाला.
गेल्या 24 तासांतील विक्रमी पाऊस (इंचामध्ये)
- म्हापसा 6.90 इंच
- पेडणे 4.90
- फोंडा 5.90
- पणजी 7.00
- जुने गोवे 7.05
- सांखळी 3.50
- काणकोण 8.50
- दाबोळी 7.50
- मडगाव 7.50
- मुरगाव 7.50
- केपे 7.50
- सांगे 9 इंच
साळावली धरणाचा जलाशय ‘ओव्हरफ्लो’
गतवर्षाच्या तुलनेत पाच दिवस आधीच आला क्षण, पाऊस जास्त पडल्याचा परिणाम, मात्र प्रवेशबंदीमुळे पर्यटकांना आनंद हुकला

सांगे : दक्षिण गोव्याचे भूषण असलेल्या आणि निसर्गसौंदर्याचा सुंदर आविष्कार घडविणाऱया सांगे येथील साळावली धरणाचा जलाशय तुडुंब भरून ‘ओव्हरफ्लो’ होऊ लागला आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा पाच दिवस लवकर धरणाचा जलाशय भरला आहे. मात्र पर्यटकांना त्याचा आनंद लुटला येणार नाही. कारण अजूनही धरणावर जाण्यास पर्यटकांना बंदी आहे.
वास्तविक केवळ सांगेवासीयच नव्हे, तर तमाम गोव्यातील लोक व राज्यात येणारे पर्यटक धरणाचा जलाशय भरून वाहण्याच्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात. तो क्षण शुक्रवार 8 रोजी सकाळी 10.54 वा. आला. मनाला भुरळ पाडणारे हे दृष्य पाहण्यासाठी साळावली धरणावर पर्यटकाची रांग लागायची. परंतु कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रवेशबंदी असल्यामुळे पर्यटकांना ‘ओव्हरफ्लो’चा आनंद लुटता आलेला नाही.
साळावली धरण पाण्याच्या बाबतीत दक्षिण गोव्याला जसे वरदान आहे तसे पर्यटनदृष्टय़ा गोव्याची शान वाढवत आहे. धरणाच्या पायथ्याशी असलेले बोटॅनिकल गार्डन येथील सौंदर्यात आणखी भर घालते. यंदा पाऊस उत्तम प्रकारे पडल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत पाच दिवस अगोदर जलाशय भरला आहे. गेल्या वर्षी जलाशय 13 जुलैला भरला होता. जलाशयातील पाण्याची पातळी 41.15 मीटरपर्यंत आली की, ‘ओव्हरफ्लो’ होऊ लागतो. यंदा 1599 मिलीमीटर अर्थात 62.95 इंच पाऊस येथे पडला असून गतवर्षाच्या तुलनेत 314 मिलीमीटर म्हणजेच 12.36 इंच जास्त पाऊस पडला आहे.
जलस्रोत खात्याच्या प्रस्तावास परवानगी मिळणे बाकी
सध्या धरणावर प्रवेशबंदी आहे. ही बंदी कोरोना काळापासून आलेली आहे. मध्यंतरी महिना-दीड महिना प्रवेश खुला केला होता. जलस्रोत खात्याने पर्यटकांना प्रवेश देण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला असून अजून सरकारकडून परवानगी मिळणे बाकी आहे. पर्यटक धरणावर प्रवेश कधी खुला होईल याची वाट पाहत आहेत. धरणावर पर्यटकांना प्रवेश नसल्याने बोटॅनिकल गार्डनचा महसूल देखील बुडाला आहे. साळावली धरण जलाशय ओव्हरफ्लो होऊ लागला की, येथे वर्षा पर्यटनाला खूप महत्त्व प्राप्त होते. येथील वातावरण माणसाला प्रसन्न करून सोडते. त्यामुळे देशी-विदेशी पर्यटक धरणाला भेट देऊन निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात.
धरणावर मिळणारा आनंद निराळाच
पावसाळ्यात येथील आनंद तसा निराळाच असतो. जुलै महिना सुरू झाला की, धरणाचा जलाशय तुडुंब भरून वाहू लागतो. उंचावरून पडणारे पाणी अंगावर शहारे आणते. धरणाच्या जलाशयात 234 दशलक्ष घनमीटर पाणी आजच्या घडीस साठविण्यात आले असून धरणाच्या मुखातून बाहेर पडणाऱया पाण्याची गती 60 घनमीटर प्रति सेकंद इतकी आहे. या धरणाचा मूळ आराखडा बदलून पुढे ‘डकबेल स्पिलवे’ धर्तीचा आराखडा तयार करण्यात आला होता. धरणाची लांबी 1004 मीटर इतकी आहे. ‘यू’ आकाराची रचना असलेले हे धरण माती वापरून बांधण्यात आले असून ते देशी व विदेशी पर्यटकांना मोहित करून सोडते. या धरणाचा जलाशय 24 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात विस्तारलेला असून तो तुडुंब भरल्याचे पाहायला मिळत आहे.
या धरणाला टेकूनच काही अंतरावर उभारलेले अत्यंत जुने आणि मूळ कुर्डी येथून जशास तसे स्तलांतरित केलेले शेळपे येथील श्री महादेव मंदिर असून धरणावर येणारे आवर्जुन तेथे भेट देतात. कोरोना येण्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने धरणावर वाहने घेऊन जाण्यास बंदी होती. मात्र धरण पाहण्यास प्रवेश खुला होता. सुट्टीच्या दिवशी तसेच विकएंडला येथे प्रचंड गर्दी व्हायची. धरणाच्या दोन्ही बाजूंनी आपली वाहने पार्क करून पायी चालत जाऊन धरण पाहावे लागत असे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या स्वप्नातल्या बोटॅनिकल गार्डन तथा मनोरंजन पार्कची अजून निर्मिती झालेली नसून मूळ आराखडय़ानुसार अनेक बाबी अजून होणे बाकी आहे. सध्या बोटॅनिकल गार्डनमध्ये पर्यटकांना प्रवेश आहे, मात्र धरणावर नाही अशी स्थिती आहे.









