वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरियातील चेंगवॉन येथे सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत भारताचा 21 वर्षीय नेमबाज तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अनिश बनवालाने पुरूषांच्या 25 मी. रॅपिड पिस्तुल नेमबाजी प्रकारात कांस्यपदक मिळवून पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले.
कर्नालच्या अनिश बनवालाने या क्रीडा प्रकारात तिसऱ्या स्थानासह कांस्यपदक मिळविले. तर जपानच्या योशीओकाने रौप्यपदक तसेच दक्षिण कोरियाच्या ली गनहेयॉकने सुवर्णपदक पटकाविले. 2024 साली होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी या स्पर्धेतील कामगिरीची नोंद करण्यात आली होती. अनिश बनवालाने या क्रीडा प्रकारात 588 गुणासह तिसरे स्थान मिळविले. त्याचप्रमाणे चीनचे नेमबाज ली आणि देई यांनीही पॅरिस ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या कोटा पद्धतीनुसार अनिश बनवाला हा पात्र ठरणारा भारताचा 12 वा नेमबाज आहे.
पुरूषांच्या ट्रॅप सांघिक नेमबाजीमध्ये भारताच्या झोरावरसिंग संधू तसेच किनान चेनाई आणि पृथ्वीराज तोंडाइमन यांनी एकूण 341 गुण नोंदवित रौप्यपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात कतारने 344 गुणासह सुवर्ण तर इराणने कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भारताने 8 सुवर्णांसह 30 पदकांची कमाई केली आहे. महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक नेमबाजी प्रकारात भारताच्या राजेश्वरी कुमारी आणि शगुन चौधरी यांना अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.









