नीरज चोप्राचे लक्ष सुवर्णपदकावर
वृत्तसंस्था/पॅरिस
प्रतिष्ठेच्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेचा पॅरिसमधील टप्पा येथे शुक्रवारी होणार आहे. अलिकडेच पुरुषांच्या भालाफेक प्रकारात 90 मी.चे उद्दिष्ट पार करणारा भारताचा नीरज चोप्रा शुक्रवारच्या स्पर्धेत जर्मनीच्या वेबरला मागे टाकत सुवर्णपदक मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. 2025 च्या डायमंड लीग अॅथलेटिक्स हंगामातील ही दुसरी स्पर्धा आहे. पुरुषांच्या भालाफेक प्रकारात या स्पर्धेत विविध देशांचे अव्वल आठ स्पर्धक सहभागी होत आहेत. दरम्यान नीरज चोप्रा, जर्मनीचा ज्युलीयन वेबर आणि दोनवेळा विश्वचॅम्पियन ठरलेला ग्रेनेडाचा अँडर्सन पिटर्स यांच्यात सुवलर्णपदकासाठी चुरस पहावयास मिळेल.
16 मे रोजी डोहा येथे झालेल्या डायमंड लीगच्या टप्प्यामध्ये जर्मनीच्या वेबरने चोप्राला मागे टाकत सुवर्णपदक मिळविले होते. या स्पर्धेत नीरज चोप्राने 90 मी.चा टप्पा पहिल्यांदाच ओलांडला होता. जर्मनीच्या वेबरने या स्पर्धेत 91.06 मी.चे अंतर नोंदवित सुवर्णपदक तर नीरज चोप्राने 90.23 मी.चे अंतर नोंदवित दुसरे स्थान मिळविले होते. पोलंड येथे 23 मे रोजी झालेल्या स्पर्धेत 31 वर्षीय वेबरने चोप्राला मागे टाकत विजेतेपद हस्तगत केले होते. पोलंडमधील स्पर्धेत वेबरने 86.12 मी.चे अंतर नोंदविले होते तर चोप्राने 84.14 मी. चे अंतर नोंदवित दुसरे स्थान घेतले होते. ग्रेनेडाच्या पिटर्सन डोहा आणि पोलंड येथे झालेल्या स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले होते. नीरज चोप्राने 2025 च्या अॅथलेटिक्स हंगामाला द. आफ्रिकेतील स्पर्धेत जेतेपद मिळवून चांगला प्रारंभ केला होता. बेंगळूरमध्ये 5 जुलै रोजी होणाऱ्या पहिल्या निरज चोप्रा क्लासीक स्पर्धेत देशातील अव्वल भालाफेकधारक सहभागी होत आहेत. विश्व अॅथलेटिक्समधील ही अ दर्जाची स्पर्धा आहे.









