चावी ताब्यात येत नाही तोपर्यंत शाळा बंद आंदोलन करू; पालक
मयुर चराटकर,बांदा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा पटसंख्या कमी असल्याने बंद पडत चालल्या आहेत. मात्र असे असताना जिल्ह्यात अशी एक शाळा आहे त्याला पटसंख्या जास्त असल्याने जागा कमी पडत आहे. जिल्ह्यात 283 एवढी सगळ्यात जास्त पटसंख्या असलेली बांदा केंद्र शाळा आहे. दरवर्षी या प्रशालेत इतर माध्यमातून किंवा शेजारील गावातील मुलांचा भरणा असतो. मात्र या शाळेच्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या एका इमारतीचा एक खाजगी संस्था वापर करत आहे. सदर संस्थेचा आणि जिल्हा परिषदेचा भाडे करार संपुष्टात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भाडेकरार संपलेली इमारत तात्काळ जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नंबर १ च्या ताब्यात देण्याचे लेखी आदेश देऊनही प्राथमिक शिक्षण खात्याकडून कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही न झाल्याने शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनावर पालक ठाम असून आज पासून शाळा बंद आंदोलन केले आहे. जोपर्यंत त्या इमारतीची चावी आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आम्ही शाळा बंद आंदोलन करू असा इशारा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पालकांनी दिला आहे. नेहमी मुलांच्या किलबिलाटाने गजबजली जाणारी भर बाजारपेठेत असणारी ही शाळा आज गजबजलेली दिसत नसून याठिकाणी शिक्षक आले असून पालकांच्या सूचनेनुसार ते बाहेर बसू न आहेत तर पालक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील या शाळेला आपल्या हक्काच्या जागेसाठी आंदोलन करावे लागते याकडे मा केसरकर यांनी लक्ष घालून योग्य तो निर्णय द्यावा अशी मागणी होत आहे यावेळी अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्यासह शाळा व्यवस्थापन सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.









