कार जळून खाक, मौजेदापोलीत मध्यरात्री थरार
दापोली प्रतिनिधी
गाडी चालवत असलेल्या वडिलांचा गप्पा मारता-मारता अचानक डोळा लागला आणि गाडी रस्त्याकडेच्या एका झाडावर आदळून गाडीने पेट घेतला. या गाडीतून सर्वजण उतरले. मात्र 4 वर्षांचा चिमुकला अंगावर सामान पडल्याने जळत्या गाडीतच अडकून राहिला, पण त्याला त्याच्या आई-वडिलांनी जळत्या गाडीत शिरून प्राणांची बाजी लावून तसुखरूप बाहेर काढले. ही थरारक घटना दापोली तालुक्यातील मौजेदापोली येथे मंगळवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास घडली.
प्रसाद जोशी हे पुणे येथे नोकरीला असतात. दापोली तालुक्यातील जालगाव-लष्करवाडी हे त्यांचे मूळगाव. त्यांचे वडील दापोली पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी होते. शिवाय ते दापोली पोलीस स्थानक हद्दीत असणाऱ्या महापुरुषाच्या मंदिराचे पुजारीही आहेत. जोशी हे आपली पत्नी विज्ञा, मोठा मुलगा आराध्य व छोटा मुलगा प्रभव यांच्यासह दिवाळीनिमित्त पुणे येथून कारने दापोलीला येत होते.
मंगळवारी पहाटे 1 च्या दरम्यान त्यांची गाडी मौजेदापोली गावातील बौद्धवाडीजवळ आली. यावेळी ते व त्यांची पत्नी गप्पा मारत होते. प्रसाद जोशी व आराध्य हे पुढील सीटवर बसले होते. तसेच विज्ञा व लहानगा प्रभव हे मागील सीटवर बसले होते. प्रभवला सीटवरच चादर अंथरून झोपवले होते. अशातच गाडी चालवत असलेल्या प्रसाद जोशी यांचा अचानक डोळा लागला व त्यांची गाडी बौद्धवाडीसमोरील आंब्यावर विरुद्ध बाजूला जाऊन आदळली. हा वेग एवढा होता की, गाडीने एका क्षणात पेट घेतला. गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच विज्ञा जोशी यांनी प्रसाद जोशी यांना हलवून जागे केले. यानंतर प्रसाद जोशी यांनी तत्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आपला व आराध्याचा सीटबेल्ट काढला व ते पत्नी विज्ञा, मुलगी आराध्याला गाडीबाहेर पडले. मात्र नंतर त्यांच्या लक्षात आले की लहानगा प्रभव गाडीतच राहिला आहे.
गाडीने एव्हाना पेट घेतला होता. शिवाय अपघात होताना गाडीचा वेग जास्त असल्यामुळे मागील बाजूला ठेवलेले सर्व सामान पुढे येऊन पडले होते. त्या सामानानेही पेटायला सुरुवात केली होती. प्रसाद व विज्ञा यांनी क्षणाचाही विलंब न लावता जळत्या गाडीत प्रवेश केला व सर्व पेटते सामान भराभर बाहेर टाकण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना सर्व सामानाच्या खाली गाडीच्या फ्लोरिंगवर प्रभव आढळला. त्याला तत्काळ बाहेर काढले व त्याला वाचवले.
गाडीतील फराळ, दागिने, कपडे पैसे जळून खाक
यात सर्वांना मुका मार लागला होता. गाडीही सर्व जळून खाक झाली होती. त्यांनी दिवाळीला आणलेला फराळ, कपडे, सोन्याच्या दागिन्यांचा डबा, पैसे, घराच्या चाव्या सगळं गाडीमध्येच जळून खाक झाले होते. गाडीने पेट घेतल्याचे पाहताच स्थानिकांनी त्यांना मदत केली. तसेच दापोली पोलिसांना व नगर पंचायतीच्या अग्निशमन यंत्रणेलाही कळवले. मात्र हा बंब उशिरा म्हणजे गाडी 80 टक्के जळून गेल्यावर आल्याची माहिती विज्ञा जोशी यांनी दिली. नगर पंचायतीच्या या गलथानपणाबद्दल नाराजी व्यक्त हेत आहे. या अपघातामुळे जोशी यांचे अतोनात आर्थिक नुकसान झालेच, शिवाय त्यांच्या दिवाळीच्या आनंदावरही विरजण पडले.









