अपार योजनेसाठी दुरुस्ती करण्याचे आदेश
बेळगाव : अपार योजनेसाठी शाळांकडून आधारकार्डमधील चुका दुरुस्त करण्यास सांगण्यात आले आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा जन्मदाखला व आधारकार्डमध्ये काहीसा फरक आहे. यासाठी महानगरपालिकेत नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. परंतु, कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्यामुळे नागरिकांना दिवसभर रांगेमध्ये थांबावे लागत आहे. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यातील सरकारी अनुदानित, विनाअनुदानित व खासगी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी 12अंकी अपार नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. आधारकार्ड प्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्याला एक स्वतंत्र क्रमांक दिला जाणार आहे. संपूर्ण देशभर ही नोंदणी केली जात आहे. परंतु, जन्म दाखला आणि आधारकार्डमध्ये नावात जरा जरी फरक असला तरी वेबसाईटमध्ये माहिती अपलोड होत नसल्याचे दिसून येत आहे. काही फरक असल्यास पालकांना जन्म दाखल्यात बदल करण्याच्या सूचना केल्या जात आहेत.
आधारकार्डमध्ये विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव देण्यात आले आहे. परंतु, जन्म दाखल्यात मात्र नाव आणि आडनाव यांचा उल्लेख करून वडिलांच्या नावाचा उल्लेख त्यानंतरच्या ओळीमध्ये करण्यात आला आहे. परंतु, अपार नोंदणी करताना ही माहिती ग्राह्या धरली जात नसल्याने जन्म दाखल्यात दुरुस्ती करण्याची सूचना शिक्षकांकडून केली जात आहे. त्यामुळे सुभाषनगर येथील महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागामध्ये पालकांची प्रचंड गर्दी झाल्याचे मागील काही दिवसात दिसून येत आहे.
वादावादीने कर्मचारीही वैतागले
जन्म-मृत्यू विभागात काही मोजकेच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यावरही अनेक मर्यादा असल्याने दिवसभरात मोजक्याच नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे पालकांना दोन ते तीन दिवस कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याने अनेक वेळा वादावादीचे प्रकार घडत आहेत. बुधवारी तर काही पालकांनी कार्यालयाच्या आतमध्ये घुसून संताप व्यक्त केला. त्यामुळे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.









