काही शाळांची पहिली यादी जाहीर : यादी पाहण्यासाठी गर्दी
बेळगाव : नर्सरी तसेच एलकेजी प्रवेशासाठी काही शाळांनी मागील महिन्यात अर्ज भरून घेतले होते. कॅम्प भागातील एका शाळेने पहिली यादी जाहीर केली. ही यादी पाहण्यासाठी शाळेच्या परिसरात पालकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे प्रवेशासाठी पालक वर्गाची सुरू असलेली धावपळ दिसून आली. अद्याप दहावी, बारावी तसेच शालांतर परीक्षा होणे बाकी असतानाच नर्सरी तसेच एलकेजी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केली. अर्जदाखल केल्यानंतर मुलाखतीनुसार पहिली यादी प्रकाशित करण्यात आली. चांगल्या दर्जाच्या शाळेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पालक वर्गांची धडपड सुरू आहे. गुरुवारी एका शाळेने नर्सरीची पहिली यादी जाहीर केली. एक हजारहून अधिक पालकांनी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी दीडशे जणांची पहिली यादी जाहीर केली. यादीमध्ये आपल्या पाल्याचे नाव आहे की नाही पाहण्यासाठी शाळेच्या परिसरात पालकांची तोबा गर्दी झालेली दिसून आली.









