खानापूर/प्रतिनिधी
‘मी मराठी आम्ही मराठी’ या उपक्रमांतर्गत मराठी भाषिकांचा पालक मेळावा रविवारी सकाळी 10 वाजता येथील शुभम गार्डन येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पुणे येथील व्याख्याते नामदेव जाधव यांचे व्याख्यान होणार आहे, अशी माहिती खानापूर येथील म. ए. समितीचे युवा कार्यकर्ते निरंजन सरदेसाई यांनी शिवस्मारक येथे बोलवलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ते या कार्यक्रमाविषयी माहिती देताना म्हणाले, तालुक्यात मराठी शाळेची अवस्था बिकट झाली आहे. तालुक्यात मराठी भाषा, संस्कृती संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. खानापूर तालुक्यातील इतिहास व संत साहित्याचे अभ्यासक सीमाचळवळीतील नेते व विचारवंत कै. उदयसिंह सरदेसाई यांच्या अमृतमहोत्सवी पुण्यस्मरणार्थ या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 19 मार्च रोजी येथील शुभम गार्डन येथे हा पालक मेळावा होणार आहे. भविष्यात तालुक्यात मराठी संस्कृती, भाषा संवर्धनासाठी तसेच शेतकऱयांच्या प्रश्नांसाठी युवकांमध्ये वाढलेली व्यसनाधीनता यासाठी पालकांनी घ्यावयाची खबरदारी याबाबत जागृती करण्यात येणार आहे. युवकांना उद्यमशील बनवण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवण्यात येणार आहेत. या उपक्रमातील एक भाग म्हणून हा पालक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात तालुक्यातील ग्रामीण भागातील दहावीत उत्तम गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच खेळात राज्यस्तरीय निवड झालेल्या खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे. तालुक्यातील दुर्गम भागात शिक्षण सेवा देणाऱया शिक्षकांचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती निरंजन सरदेसाई यांनी दिली. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष विनोद पाटील, रमेश धबाले, दिग्विजय देसाई, अभिजीत देसाई, सदानंद पाटील, नागेश भोसले, ईश्वर बोबाटे, प्रल्हाद मादार यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









