निकृष्ट धान्याबाबत पालक समिती, पालक आक्रमक
आचरा | प्रतिनिधी
आचरा येथील केंद्र शाळेला आलेले पोषण आहाराचे धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याने शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी आक्रमक पवित्रा घेत मागे पाठवत मुलांच्या आरोग्याशी खेळणा-या ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. शाळांतील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढावे, मुलांना सकस आहार मिळावा आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबावी यासाठी केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना राज्यात सुरू करण्यात आली . शासनाने चांगल्या उद्देशाने सुरू केलेली ही योजना शाळांना अधूनमधून होणारया निकृष्ट दर्जाच्या धान्य पुरवठ्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक यांना त्रासदायक ठरत आहे.
धान्य घेऊन आलेल्या गाडीतील धान्य पालकांनी तपासून पाहिलं असता ते धान्य दर्जाहीन होते यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे जयप्रकाश परुळेकर, प्रथमेश घाडी, संदीप पांगम, अनिकेत घाडी, बाळा कामतेकर, नम्रता परब, सुरेखा सामंत, मनिषा मिराशी यांसह अन्य पालक शिक्षक माने, आचरेकर आदींनी निकृष्ट धान्याबाबत आक्षेप घेत धान्य ताब्यात घेण्यास नकार दिला. समितीने सदर गाडीचालकाकडे धान्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी केली असता त्याच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे चालकाकडून सांगण्यात आले.









