पाल्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून लक्ष देणे गरजेचे
प्रतिनिधी / बेळगाव
विद्यार्थ्यांची जडण घडण, कुटुंब, समाज व महाविद्यालयांतून होत असते. वर्तमान काळात पालकांनी पाल्यांविषयी जागरुक असण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक, नैतिकता निर्माण करण्यासाठी पालक व महाविद्यालय दोघांनी मिळून कार्य करणे शक्मय आहे. पाल्यांची सर्वच जबाबदारी महाविद्यालयांवर सोपवून चालणार नाही. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती, वर्तन, अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे.
आपले पाल्य मोबाईल व इतर अनावश्यक गोष्टीत वेळ वाया घालवत असेल तर दुर्लक्ष न करता समज देणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या पाल्याशी पालकांनी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून योग्य ते मार्गदर्शन करणे आज काळाची गरज बनली आहे, असे मार्गदर्शन पालक मेळाव्यात बोलताना प्राचार्य आर. डी. शेलार यांनी केले. ज्योती महाविद्यालयातील बारावी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना कॉलेजमध्ये मेळाव्यासाठी बोलाविण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. सुरेश पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. त्यानंतर प्राचार्य आर. डी. शेलार यांनी मार्मिक शब्दात मार्गदर्शन केले. विज्ञान शाखेसंबंधी प्रा. एस. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना नियमितपणे अभ्यास केला तर नीट, सीईटीसारख्या परीक्षेच्या माध्यमातून चांगले करिअर करता येऊ शकते. त्यासाठी पालकांनी जबाबदारी घेतली पाहिजे.
वाणिज्य शाखेसंबंधी बोलताना प्रा. नितीन घोरपडे यांनी बारावी परीक्षा व मूल्यमापनसंबंधी सविस्तर माहिती देऊन अभ्यासाशिवाय पर्याय नाही, असे मार्गदर्शन केले.
कला शाखेसंबंधी बोलताना प्रा. डी. ए. निंबाळकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या वर्तनाकडे तसेच शैक्षणिक प्रगती पाहण्यासाठी महिन्यातून एखाद्या तरी प्राध्यापकाशी संपर्क साधला पाहिजे. त्यानंतर पालकांनी विविध सूचना केल्या.
प्राचार्य आर. डी. शेलार यांनी प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे दिली. प्रा. सुरेश पाटील यांनी आभार व्यक्त केले. यावेळी पालक बहुसंख्येने उपस्थित होते.