भारतात जर मुलाला किंचित त्रास झाला तरीही आईवडिलांना सहन होत नाही. आमच्याकडे स्वत:च्या मुलांना त्रासात एकटे सोडण्याचा प्रकार घडत नाही. परंतु विदेशात आईवडिलांना मुलांबद्दल खास मोह नसल्याचे उदाहरण दिसुन आले आहे. स्पेनमध्ये एका आईवडिलांवर जोरदार टीका होतेय. या आईवडिलांनी स्वत:च्या मुलांना विमानतळावर एकटे सोडत स्वत: फ्लाइट पकडण्यासाठी जात होते. एका 10 वर्षीय मुलाला त्याच्या आईवडिलांनी विमानतळावर एकटे सोडले होते. मुलाकडे प्रवासासाठी आवश्यक दस्तऐवज नसल्याचे कळल्यावर आईवडिल स्वत: फ्लाइट पकडून देशातून रवाना झाले. तर मुलगा टर्मिनलवर राहिला. या घटनेची माहिती विमानतळाच्या कर्मचारी लिलियन यांनी सोशल मीडियावर शेअर केली. त्या स्वत: एक एअर ट्रॅफिक कंट्रोलर आहेत. त्यांनी या अनुभवाला अत्यंत अजब ठरवत याप्रकरणी नाराजी व्यक्त केली.
मुलाने त्याचे आईवडिल सुटीनिमित्त विदेशात जात असून विमानात बसल्याचे पोलिसांना सांगितले. अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता मुलगा मुदत संपलेल्या पासपोर्टसोबत प्रवास करत असल्याचे दिसून आले, त्याच्याकडे आवश्यक व्हिसा नव्हता. दस्तऐवज अपूर्ण होते. एअरलाइनने मुलाला विमानात जाण्याची अनुमती नाकारली. यानंतर आईवडिलांनी मुलाला तेथे सोडून दिले आणि एका नातेवाईकाला फोन करत मुलाला विमानतळावरून नेण्यास सांगितले. पोलिसांना हा प्रकार सामान्य वाटला नाही, त्यांनाही धक्का बसला. मी स्वत: एक आई आहे. आईवडिल मुलाला विमानतळावर सोडून आरामात प्रवासास जातात हे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे असे लिलियनने म्हटले आहे. तिने जारी केलेल्या व्हिडिओला लाखो ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर संबंधित पालकांच्या बेजबाबदारपणावर नाराजी व्यक्त करत आहेत. कुठल्याही स्थितीत मुलाला एकटे सोडले जाऊ नये असे लोकांचे म्हणणे आहे. स्पेनच्या विमानतळ पोलिसांनी कारवाई करत आईवडिलांना विमानातून उतरवत त्यांना पोलीस स्थानकात नेले. त्यांना अटक करण्यात आली की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.









