कोल्हापूर :
मांगल्याच्या सण असणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पहिलीत प्रवेश घेण्यासाठी महापालिकेच्यावतीने प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या बऱ्याच शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निनिश्चत करण्यासाठी गर्दी होत आहे. जरगनगर येथील महापालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालयात गुढी पाडव्याच्या आदल्यादिवशी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत पालकांनी गर्दी पेंली होती.
जरगनगर शाळेत पहिलीसाठी यंदा एकूण 400 ते 450 पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. शाळेची गुणवत्ता व दर्जा पाहून पालकांचा आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आग्रह केला जातो. दरवर्षी गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री गर्दी होत होती. यंदा तर सकाळपासूनच प्रवेशासाठी रांगा लावल्या होत्या. राज्यात सर्वाधिक पटसंख्या असणारी एकमेव महापालिकेची शाळा म्हणून नावलौकिक आहे. शाळेचा एकूण पट सुमारे दोन ते अडीज हजाराहून अधिक असतो. शाळेत विविध उपक्रमासह सर्वच शासकीय योजना व गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे शाळेची पटसंख्या वाढत आहे. त्यामुळे दरवर्षी शेकडो पालक प्रवेशासाठी गर्दी करतात.
महापालिकेच्या शाळांचा दर्जा व गुणवत्ता वाढत असल्याने बहुतांश शाळेतील अॅडमिशन फुल्ल झाले आहेत. त्यातच काही शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत चमक दाखवतात. यामुळे राज्यात शाळांचा डंका पिटला गेला आहे. महापलिकेच्या सर्वच शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जाते. गणवेश, पाठ्यापुस्तके, पोषण आहार, शिष्यवृती आदी सुविधामुळे शैक्षणिक सुविधा वाढत आहेत. यामुळेच महापालिकेच्या शाळांकडे ओढा वाढत आहे. मनपाच्या 20 शाळा सेमी इंग्रजी माध्यमाच्या होणार आहेंत. यामुळे शाळांचा दर्जा वाढत आहे. मुलांना बौद्धिक क्षमता वाढावी यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.
- प्रवेशासाठी गर्दी होणाऱ्या शाळा
श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालय, टेंबलाईवाडी विद्यालय, गोविंद पानसरे विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, विचारे विद्यालय, प्रिन्स शिवाजी विद्यालय, जाधववाडी, नेहरूनगर विद्यालय, लक्षतीर्थ विद्यालय, वीर कक्कया विद्यामंदिर, श्री जोतिर्लिंग विद्यालय, राजे छत्रपती संभाजी विद्यालय, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर, उर्दू–मराठी शाळा.








