मुक्तीदिन सोहळय़ानंतर सरकारी शाळेसमोर निदर्शने : महालक्ष्मी हायस्कूलकडूनही विरोध

प्रतिनिधी /फोंडा
तळावली येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या आवारात उभारण्यात येणाऱया मोबाईल टॉवर विरोधात पालक व ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत, जोर जबरदस्तीने टॉवर उभारला गेल्यास मुलांना शाळेत पाठविणे बंद करावे लागेल, असा इशारा दिला आहे. गोवा मुक्तीदिन सोहळय़ाला मोठय़ा संख्येने शाळेच्या आवारात जमलेले पालक व टॉवरला विरोध करणाऱया ग्रामस्थांनी जोरदार निदर्शने केली.
डॉवरच्या मुद्दय़ावर विशेष ग्रामसभा बोलवा
आमचा मोबाईल टॉवरला विरोध नाही, पण तो शाळेच्या आवारात उभारुन मुलांच्या जीवाशी खेळू नये, असे पालक व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नियोजित टॉवरसाठी काही ग्रामस्थांनी शाळेपासून लांब दुसरी पर्यायी जागा देऊ केली आहे. पण ग्रामस्थांची मागणी झुगारुन पोलीस संरक्षणार्थ टॉवरचे काम सुरु केल्याने त्याविरोधात संताप उसळला आहे. टॉवरच्या या मुद्दय़ावर विशेष ग्रामसभा बोलवावी अशी काही ग्रामस्थांची मागणी आहे. या प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये इयत्ता पहिले ते चौथीचे वर्ग भरत असून एका खोलीत बालवाडी व लोकविश्वास प्रतिष्ठानचे वर्ग चालतात. त्यामुळे सर्वांनीच या टॉवरपासून धास्ती घेतली आहे.
टॉवरच्या हट्टापायी शाळाच बंद पडणार
सरकारी प्राथमिक शाळेचा माजी विद्यार्थी व एक पालक ओंकार फडते यांच्या म्हणण्यानुसार सध्या सरकारी शाळांची पटसंख्या घटत चालली आहे. त्यामुळे बऱयाच सरकारी शाळा बंद पडत आहेत. अशा परिस्थितीत शाळेच्या आवारात पालकांची धास्ती वाढवून मोबाईल टॉवर उभारले गेल्यास पालक मुलांना दुसऱया शाळेत पाठवतील. तळावली येथील ही शाळा पोर्तुगीज काळापासून सुरु आहे. गावातील काही पिढय़ांनी त्यात शिक्षण घेतले आहेत. टॉवरच्या या हट्टापायी ही शाळा कायमची बंद होणार नाही, याचीही विचार व्हावा. राज्याचे शिक्षणमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून टॉवर दुसऱया जागी हलविण्यासाठी संबंधित सरकारी खात्याला आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तळावली येथील ज्या सरकारी प्राथमिक शाळेच्या आवारात हा टॉवर उभारला जात आहे, तेथून अवघ्या पन्नास मिटर्सवर श्री महालक्ष्मी हायस्कूल व त्यांची पूर्वप्राथमिक शाळा आहे. या शाळेचे पालक व व्यावस्थापनानेही टॉवरला विरोध केला आहे. शिवाय सभोवताली दाट लोकवस्ती आहे, तेथील ग्रामस्थही टॉवरच्या विरोधात आहेत. हायस्कूलशी संबंधीत श्रीप्रसाद सावंत यांनी टॉवरमुळे इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन होत असल्याचे सांगून पर्यावरणवादी संस्था व जागतिक आरोग्य संघटनेनेही रेडिएशनपासून आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले आहे. पर्यावरण, पक्षी विश्व व माणसाच्या आरोग्यावर रेडिएशनचे परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे मुलांच्या जीवाशी न खेळता हा टॉवर गावातच दुसऱया जागी उभारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महालक्ष्मी हायस्कूलच्या पालकांनीही घेतला धसका
महालक्ष्मी प्राथमिक विभागाच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष चंद्रानन नाईक यांनी गावात टॉवरची गरज आहे, पण शाळेच्या आवारात उभारणे हे सर्वांनाच गैरसोयीचे असल्याचे सांगितले. सध्या पालकांनी या टॉवरमुळे धसका घेतला आहे. त्याचा परिणाम म्हणून बहुतेक पालक आपल्या मुलांना दुसऱया शाळेत पाठवतील व महालक्ष्मी प्राथमिक शाळा व हायस्कूलवर त्याचे दुरगामी परिणाम होणार असल्याचे ते म्हणाले. हायस्कूलचे व्यवस्थापक शाणुदास सावंत यांनीही शाळा व मुलांच्या हितासाठी आमचा नियोजित जागेत टॉवरला विरोध असल्याचे स्पष्ट केले. जर शाळेत मुले येणे बंद झाल्यास, संस्थेचे अस्थित्त्वच धोक्यात येईल. याचा गांभीर्याने विचार करुन गावातच दुसऱया पर्यायी जागेत हा टॉवर हलवावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
सरपंच व पंचायत मंडळाने पाठिंबा द्यावा
सरकारी प्राथमिक शाळेचे पालक सोमनाथ नाईक हे सुरुवातीपासून या टॉवरला विरोध करीत आहेत. पालक व ग्रामस्थ मिळून 71 लोकांच्या स्वाक्षरी असलेले लेखी निवेदन संबंधित खात्याला पाठवल्याचे त्यांनी सांगितले. काही लोक या मुद्दय़ाला राजकीय वळण देत आहेत. तसेच ग्रामस्थांचा टॉवरला पाठिंबा असल्याची दिशाभूलही केली जात आहे. सरपंच व पंचायत मंडळाने अशा परिस्थितीत लोकांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. कारण हा एका शाळेचा प्रश्न नसून संपूर्ण गावाचा प्रश्न आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान या मुद्दय़ावर रिव्हॉल्युशनरी गोवन्सनेही पाठिंबा दर्शविला असून त्यांचे स्थानिक नेते प्रेमानंद गावडे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उदीत नाईक, केशव गावडे, अविनाश पवार, अवित नाईक, स्वप्नील भंडारी, परेश कुंडईकर आदी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.









