धोकादायक वर्गखोली वगळून शाळा सुरू ठेवण्याची मागणी
बेळगाव : माळी गल्ली येथील सरकारी शाळा क्र. 4 ची इमारत धोकादायक असल्याचे सांगत ही शाळा इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, याला स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी विरोध दर्शवला. शाळेचे पूर्ण सर्वेक्षण करून जो वर्ग धोकादायक आहे, तो बंद ठेवून उर्वरित शाळा आहे तशीच सुरू ठेवावी, अशी मागणी नागरिकांनी सीआरपी यांच्याकडे केली. एकीकडे शहरातील सरकारी शाळांमधील पटसंख्या झपाट्याने कमी होत असताना दुसरीकडे प्रशासनाच्या धोरणांमुळे शाळा बंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील माळी गल्ली येथे मराठी व कन्नड अशा दोन्ही माध्यमाच्या शाळा आहेत. शाळेची इमारत जीर्ण झाल्याने काही ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे ही शाळा तात्पुरत्या स्वरुपात फुलबाग गल्ली येथील शाळेमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय शुक्रवारी पालकांना सांगण्यात आला. याला पालकांनी जोरदार विरोध केला. विद्यार्थी लहान असल्यामुळे फोर्ट रोड येथील मुख्य रस्त्यावरून फुलबाग गल्ली शाळेपर्यंत पोहोचणे धोक्याचे आहे.
बरेच पालक नोकरी व्यवसायात असल्याने त्यांना विद्यार्थ्यांना ने-आण करणे शक्य नसते. जर माळी गल्ली शाळा कायमस्वरुपी फुलबाग गल्ली येथे स्थलांतरित केल्यास शाळेचे अस्तित्व नष्ट होईल. बेळगाव परिसरातील सर्वात जुनी मराठी शाळा अशी या शाळेची ओळख आहे. त्यामुळे शाळेचे स्थलांतर करू नये, अशी मागणी पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. काही नागरिकांनी गटशिक्षणाधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चाही केली. शाळेचे अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करावे. यामध्ये जी धोकादायक वर्गखोली आहे, ती बंद ठेवून उर्वरित शाळा आहे तशीच सुरू राहिल्यास विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचणे सोयीचे होईल, अशी मागणी केली. शाळेचे मुख्याध्यापक तसेच परिसरातील सीआरपी यांच्यासमोर पालकांनी ही मागणी केली. आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना पालकांची बाजू सांगू, असे आश्वासन त्यांनी दिले. तूर्तास या वादावर पडदा पडला असला तरी स्थलांतर झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. यावेळी माजी नगरसेवक रमेश कळसण्णावर, बसवराज गणाचारी, मेघन लंगरकांडे, बाळू पवार यासह इतर उपस्थित होते.









