बेळगावच्या उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता
प्रतिनिधी/ बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वेने घेतलेल्या निर्णयामुळे बेळगाव जिल्ह्यातील उद्योग व व्यापारीक्षेत्रावर परिणाम जाणवला आहे. नैर्त्रुत्य रेल्वेने जिल्ह्यातील आठ रेल्वेस्थानकांवरील पार्सल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बेळगावच्या उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नैर्त्रुत्य रेल्वेने हुबळी विभागातील काही लहान रेल्वेस्थानकांमधील पार्सल सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. खानापूर, अळणावर, कुडची, उगार खुर्द, रायबाग, गोकाक रोड, पाच्छापूर या रेल्वेस्थानकांवरील पार्सल सेवा यापुढे बंद ठेवली जाणार आहे.
2022-23 या आर्थिक वर्षात नैर्त्रुत्य रेल्वेने पार्सल सेवेंतर्गत तब्बल 8 हजार 71 कोटी रुपयांचा महसूल जमा केला. कोरोनाकाळापासून नैर्त्रुत्य रेल्वेच्या पार्सल सेवेला उत्तम प्रतिसाद मिळू लागला होता. नैर्त्रुत्य रेल्वेच्या बेंगळूर, म्हैसूर व हुबळी या तिन्ही विभागांमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई झाली होती. बेळगावमधील इतर साहित्याबरोबरच दूध व दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक रेल्वेद्वारे करण्यात येत होती.
कुडची, उगार खुर्द, रायबाग यासारख्या लहान रेल्वेस्थानकांवरून मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळूर येथून कृषीमाल व इतर साहित्याची वाहतूक करणे सोयीचे ठरत होते. परंतु, नैर्त्रुत्य रेल्वेने लहान रेल्वेस्थानकांवरील पार्सल सेवा बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे कृषीक्षेत्रासह उद्योगक्षेत्रालाही फटका बसणार आहे.
प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत असल्यामुळे सेवा बंद
-अनिश हेगडे (जनसंपर्क अधिकारी, नैर्त्रुत्य रेल्वे)
लहान रेल्वेस्थानकांवर रेल्वे केवळ चार ते पाच मिनिटे थांबत असल्यामुळे पार्सलची वाहतूक करणे अवघड ठरते. काहीवेळा पार्सल अधिक असल्यास प्रवासी वाहतुकीवर त्याचा परिणाम जाणवत असल्यामुळे सेवा बंद करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.









