गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
प्रतिनिधी/ चिपळूण
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट अखेर दीड-महिन्यांनंतर बुधवारपासून 24 तास वाहतुकीसाठी अटी, शर्तींवर खुला करण्यास जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आदेश दिले आहेत. गणेशोत्सव काळात वाढणारी वाहतूक आणि पावसाचा जोरही कमी झाल्याने घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी महामार्ग विभाग, पोलीस अणि परिवहन विभागाने उपाययोजना करून त्यांच्या निरीक्षणाखाली खुला करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या जुलै महिन्यात जोरदार पावसात दरडी कोसळल्याने तसेच माथ्यावरील परशुरामच्या डोंगराला भेगा गेल्याने 5 जुलैपासून काही दिवस हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर 14 जुलैपासून अटी-शर्तींवर दिवसा केवळ अवजड वाहनांच्या एकेरी मार्गासाठी हा घाट सुरू तर सायंकाळी 7 नंतर घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव जवळ आल्याने या संदर्भात आमदार शेखर निकम, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेली चर्चा, स्थानिक स्तरावरून वाढती मागणी तसेच पोलीस, महामार्ग आणि स्थानिक प्रशासन यांनी दिलेला अभिप्राय लक्षात घेऊन घाट अटी-शर्तीवर बुधवारपासून सुरू केला आहे.
यामध्ये घाटात दरडप्रवण क्षेत्रात रात्रीच्या वेळेत पुरेशा प्रकाशाची व्यवस्था, ठेकेदार कंपनीकडून नियमित पेट्रोलिंग, जेसीबी, क्रेन, पोकलेन अशा अत्यावश्यक सेवा 24 तास उपलब्ध करण्याबरोबरच आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना घाट सुरू करताना सबंधितांना देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून दिला गेल्यानंतर घाटातील वाहतुकीबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासन, पोलीस, महामार्ग विभागाने संयुक्तपणे घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत.









