ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतले आहेत. तसेच डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेलं त्यांचे निलंबनही रद्द करण्यात आले आहे.
परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर परमबीर सिंह यांच्यावर खंडणी, भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार असे वेगवेगळे आरोप झाले. सिंह यांच्याविरोधात खंडणीचे आठ गुन्हे होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अँटिलिया बॉम्ब प्रकरणात कथित अनियमिततेमुळे त्यांचे निलंबन करण्यात आले होते. आता सिंह यांच्यावरील निलंबनाची कारवाई शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतली आहे. अखिल भारतीय सेवा नियम, 1969 च्या नियम 8 अंतर्गत परमबीर सिंह, IPS (निवृत्त) यांच्या विरुद्ध 02/12/2021 रोजी जारी केलेले आरोपपत्र मागे घेण्यात आले आहे आणि हे प्रकरण बंद करण्यात येत आहे, सरकारचे संयुक्त सचिव वेंकटेश भट यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. परमबीर सिंह यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे.
परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अनिल देशमुख हे बराच काळ तुरुंगातही होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.








