अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, सामान्य माणूस जसा संसारात रमलेला असतो. त्याप्रमाणे वरवर पाहता आत्मज्ञानी किंवा मुक्त पुरुषही संसारसुखात रममाण झाला आहे असे दिसत असले तरी त्या इंद्रीयसुखाची बाधा त्याला कदापि होणे शक्य नसते. याचे कारण असे की, आत्मज्ञानी पुरुष संसारसुखापेक्षा कितीतरी उच्च दर्जाचे सुख सदैव उपभोगत असतो. आणखी सांगायचं म्हणजे, सामन्यांचे संसारसुख हे कोणत्या ना कोणत्या कारणावर अवलंबून असते. नवनवीन वस्तूंची त्याला अपूर्वाई असते, निरनिराळ्dया प्रकारचे विषयसुख त्याला आवडत असते. थोडक्यात सुखी होण्यासाठी त्याला कोणत्या ना कोणत्या कारणाची आवश्यकता असते. कालांतराने ते कारण जसजसे जुने होत जाईल तसतसे त्याचे त्या सुखापासून मिळणाऱ्या आनंदातील सुखाचे नाविन्य संपते. याउलट आत्मज्ञानी पुरुष कोणत्याही कारणाशिवाय सुखाच्या लहरी अनुभवत असल्याने त्याच्या सुखाला कधीही ओहोट हा शब्द लागू होत नाही. याची कल्पना असल्याने आत्मज्ञानी पुरुष जरी संसारसुखात रममाण झालेला दिसत असला तरी तो केवळ देखावाच असतो. त्यातील निरर्थकता त्याला समजलेली असल्याने तो मनाने त्यापासून कितीतरी दूर असतो. तो संसारातील सुखदु:खापासून अलिप्त असण्याचे आणखी एक कारण म्हणजे सर्वसामान्य माणसे स्वत:ला कर्ता समजत असतात. त्यामुळे ती जी कर्मे करत असतात त्यातून त्यांना सुखदु:खाची जाणीव होत असते पण आत्मज्ञानी पुरुष स्वत:ला कर्ता समजत नसल्याने तो कोणते कर्म करत आहे, त्यातून सुख निर्माण होईल की, दु:ख वाटेल या गोष्टीशी त्याला काहीही देणेघेणे नसते. त्यामुळे प्रारब्धानुसार आवश्यक ते कर्म करून त्यातून कोणतीही अपेक्षा न बाळगता तो अलगद बाजूला होत असतो. आत्मज्ञानी पुरुषाला परमतत्वाची प्राप्ती झालेली असते. ते ज्याप्रमाणे सगळ्dयापासून अलिप्त असते. त्याप्रमाणे तोही संसारापासून अलिप्त असतो. हे परमतत्व सगळ्यापासून अलिप्त असते. अलिप्त म्हणजे किती तर ते आकाशापेक्षाही अलिप्त असते. उद्धव म्हणाला, कृष्णा आता हे आकाशाचे आणखी काय नवीन काढलेस? उद्धवाचा प्रश्न ऐकून, ज्या हास्यावरून सर्व भुवने ओवाळून टाकावीत असे लाखमोलाचे स्मितहास्य भगवंतानी केले आणि म्हणाले, पंचमहाभूतांपैकी आकाशाचा थांग इतर चार महाभूतांना कधीही लगत नाही कारण ते त्यांच्यापासून पूर्णतया अलिप्त असते. गमंत म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू ह्या चारही महाभूताना आकाशाने व्यापून टाकले आहे पण या चार महाभूतांचा मळसुद्धा आकाशाला लागत नाही. आकाश पृथ्वीच्या धुळीने कधी मळत नाही किंवा धुराच्या कल्लोळाने धुरकटत नाही. तसेच अग्नीची आच लागून जळत नाही. सोसाट्याचा वारा कधी आकाशाला उडवू शकत नाही. पाण्याने कितीही प्रयत्न केला तरी ते आकाशाला बुडवू शकत नाही. सूर्याच्या किरणांच्या उष्णतेने आकाशाला कधी घाम येत नाही की, बर्फ पडल्यावर येणाऱ्या थंडीमुळे काकडून आकाशाला कधी हुडहुडी भरत नाही. तसेच पावसाच्या जोरदार सरींनी कधी आकाश ओले होत नाही. थोडक्यात आकाशावर कोणत्याही गोष्टींचा कधीही परिणाम होत नाही. कारण ते सर्व गोष्टींपासून अलिप्त असते. याप्रमाणे आकाशाच्या अलिप्तपणाचे महत्त्व निरनिराळी उदाहरणे देऊन भगवंतानी उद्धवाला सांगितले. ते पुढे म्हणाले, आकाशाचा अलिप्तपणा तुला एव्हढ्यासाठी सांगितला की, चराचराच्याही पलीकडे असलेले, त्रिगुणातीत चिन्मात्र अक्षर परब्रह्म आकाशापेक्षाही अलिप्त असते. हे परब्रह्म अजरामर अविनाशी असून ते स्वयंप्रकाशाने प्रकाशमान झालेले असते. त्याला समोर दिसणारे सर्व विश्व हे आत्मत्त्वावर भासमान असून पूर्णपणे खोटे आहे याची शंभर टक्के खात्री पटलेली असल्याने त्याचे त्यात अद्वैत साधलेले असते. त्यामुळे तो परब्रम्हाशी एकरूप झालेला असतो.
क्रमश:








