► वृत्तसंस्था / अहमदाबाद
भारतभर प्रसिद्ध असणाऱ्या ‘वाघ बकरी’ चहा कंपनीचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाला आहे. नऊ दिवसांपूर्वी ते पहाटे चालण्याचा व्यायाम घेत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला होता. त्यांना रक्तबंबाळ स्थितीत रुग्णालयात नेण्यात आले होते. पण सात दिवसांनंतर सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. ते अवघ्या 49 वर्षांचे होते, अशी माहिती देण्यात आली.
15 ऑक्टोबरला पहाटे ते नेहमीप्रमाणे चालण्याचा व्यायाम घेण्यासाठी घराबाहेर पडले होते. इस्कॉन अंबली मार्गानजीक त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. कुत्र्यांपासून सुटका करुन घेण्यासाठी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात त्यांचा पाय घसरुन ते पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. कुत्र्यांच्या चाव्यांमुळेही त्यांना जखमा झाल्या होत्या. ही घटना पाहणाऱ्यांपैकी काहींनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले. तेथे चोवीस तासांनंतर त्यांची प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे सात दिवस त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. तथापि त्यांच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होत गेल्याने अखेर रविवारी रात्री उशीरा त्यांचा मृत्यू झाला.
कुटुंबाचा व्यवसाय
चहा भुकटीचे पॅकिंग आणि विक्री करण्याचा त्यांचा कौटुंबिक व्यवसाय गेल्या चार पिढ्यांपासूनचा आहे. त्यांनी अमेरिकेच्या लाँग आयलँड विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतल्यानंतर कुटुंबाच्या पारंपरिक व्यवसायात काम करण्यास प्रारंभ केला. आपल्या व्यावसायिक बुद्धीमत्तेच्या जोरावर त्यांनी या व्यवसायाची 25 वर्षांच्या कालावधीत मोठीच भरभराट केली. त्यांनी प्रारंभ करताना 100 कोटी उलाढालीचा असणारा चहा पूड निर्मिती आणि विक्री व्यवसाय आता 2,000 कोटी हून अधिक उलाढालीचा झाला आहे. ते स्वत: उच्च गुणवत्तेचे चहा चव परीक्षक (टी टेस्टर) आणि चहा मूल्य निर्धारक होते, अशीही माहिती देण्यात आली आहे.
सामाजिक कार्यात रस
व्यवसाय करीत असताना त्यांनी सामाजिक कार्यातही मोठा रस घेतला होता. पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीवनाच्या क्षेत्रात त्यांनी मोठे कार्य केले आहे. अनेक निसर्ग संवर्धन प्रकल्पांना त्यांनी सढळ हस्ते साहाय्य केले होते. पर्यावरणपूरक व्यवसायवृद्धी हे त्यांचे प्रमुख ध्येय होते. ते आयसीसी या संस्थेचेही कार्यरत सदस्य होते. त्यांना प्रवासाची अत्यंत आवड होती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी विदिशा आणि कन्या पारिशा असा परिवार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या अकाली निधनामुळे उद्योगक्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.









