अध्याय एकतिसावा
एकादश स्कंधाचे महात्म्य सांगताना नाथमहाराज म्हणतात, ह्यातील प्रत्येक श्लोक तर महत्त्वाचा आहेच परंतु त्यातील काही काही श्लोकांचे महात्म्य तर फारच थोर आहे. उदाहरणार्थ ‘मामेकमेव शरणं’ ह्या एकाच श्लोकाचे सामर्थ्य एव्हढे आहे की, तो जो श्रद्धेने वाचेल आणि हरीच्या उपदेशानुसार हरीला अनन्यभावाने शरण जाईल तर, त्याच्यावर असलेला मायेचा पगडा श्रीहरीच्या कृपेने उठेल.
श्रीहरी त्या मायेचा गळा धरून तिला बाजूला करेल आणि त्यामुळे त्याला संसारातले मिथ्यत्व लक्षात येऊन तो आपोआपच त्यातून मुक्त होईल. ‘मामेकमेव शरणं’ ह्या श्लोकाचे महत्त्व सांगून झाल्यावर नाथ महाराज आता ‘निरपेक्षं मुनिं शांतं’ ह्या श्लोकाचे महत्त्व सांगत आहेत.
ह्या श्लोकाचे महात्म्य ज्याच्या लक्षात येईल त्याचा सेवक होऊन श्रीकृष्णनाथ त्यांची सेवा करेल. त्यामुळे त्याला संसारात आपले काय होईल, कसे होईल ह्या चिंता संपुष्टात येतील. हा संपूर्ण श्लोक असा आहे, निरपेक्षं मुनि शांतं निर्वैरं समदर्शनम्। अनुव्रजाम्यहं नित्यं पूयेयेत्यंघ्रि-रेणुभि?।। भगवंत सांगतात, उद्धवा, निष्काम, शांत, निर्वैर और समदृष्टि असलेल्या मुनींची चरण धूळ होऊन मी पवित्र होतो. त्यामुळे त्यांच्या पावलावर पाउल टाकून मी सदैव त्यांच्या पाठीमागून चालत राहतो.
येथे सांगायची विशेष गोष्ट म्हणजे नाथमहाराज नुसते सांगायचे म्हणून ह्या श्लोकाचे महात्म्य सांगत नसून, श्लोकात उल्लेख केल्याप्रमाणे ते स्वत: निष्काम, शांत, निर्वैर और समदृष्टि असल्याने त्यांनी ह्या श्लोकाची प्रत्यक्षात अनुभूती घेतली होती. त्यांच्या वर उल्लेख केलेल्या गुणांमुळे भगवंत स्वत: त्यांच्या घरी त्यांचे सेवक म्हणून रहात होते. त्यांनी स्वत:चे नाव श्रीखंड्या असे सांगितले होते. ते नाथांच्या घरी गोदावरीचे पाणी कावडीने भरण्याचे काम प्रामुख्याने करीत. त्यावेळी ते नाथमहाराज नदीवर अंघोळीला जात असताना त्यांच्या पाठीमागे राहून त्यांच्या पावलावर पाउल टाकून चालत असत. अर्थातच भगवंत स्वत: पाठीशी असल्याने नाथमहाराजांना श्लोकात सांगितल्याप्रमाणे संसाराची चिंता करावी असे कधीच वाटले नाही. तसं बघितलं तर एकादश स्कंधातील प्रत्येक श्लोकच संसारातील संसार बंधन नष्ट करणारा आहे.
ह्यातील प्रत्येक श्लोक हा यदुनायकाच्या मुखातून बाहेर पडलेला असल्याने ह्यात नवल असे काही नाही. संपूर्ण भागवत महापुराणातील एकादश स्कंधाचे महात्म्य एव्हढे आहे की, ह्या स्कंधाचा अभ्यास करून त्यानुसार वागल्यास तो मोक्ष मिळवून देण्याचे साधन ठरतो.
ह्यातला एखादा श्लोकाच काय, त्या श्लोकातील एखाद्या चरणही संसारबंधन तोडून टाकतो. एव्हढे सामर्थ्य ह्यातील प्रत्येक श्लोकाच्या चरणात आहे. भगवान श्रीकृष्ण हे वेदांचे जन्मस्थान आहेत. त्यांच्या मुखातून ह्या एकादश स्कंधाचे निरुपण झालेले असल्याने त्या निरुपणामध्ये सगळा वेदार्थ आपोआपच आलेला असल्याने येथे वेदार्थ अगदी माहेरी आल्यासारखा वाटतो. ज्याप्रमाणे सासुरवाशीण माहेरी आली की, तिच्या वागण्याबोलण्यात एक प्रकारची सहजता येते व त्यामुळे माहेरातील तिचे सर्व नातलग अगदी सुखावून जातात, त्याप्रमाणे हा माहेरी आलेला वेदार्थ सर्व साधकांना सुखावून जातो. त्या सुखातून त्यांना स्वानंद गवसतो. दुधाच्या विरजणाला घुसळून काढून त्यातून लोणी काढतात त्याप्रमाणे वेदार्थशास्त्राचे मंथन करून म्हणजे तो अगदी घुसळून काढून व्यासांनी महाभारतरुपी नवनीत साधकांच्या हाती दिले आहे. त्या महाभारताचा मतितार्थ म्हणजे श्रीभागवत-हरिलीला होय. त्या भागवताचा सारांश म्हणजे भगवंतांनी स्वत: प्रबोध केलेला परब्रह्मरस ह्या एकादश स्कंधात आलेला आहे.








