वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियोचा सुवर्णपदक विजेता पॅरा शटलर प्रमोद भगत पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये त्याचे विजेतेपद राखू शकणार नाही. कारण त्याला जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या अँटी-डोपिंग ठावठिकाणाविषयक कलमाचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
भारताचा टोकियो, 2020 पॅरालिम्पिकमधील विजेता प्रमोद भगत याला 18 महिन्यांच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे याची जागतिक बॅडमिंटन महासंघाने पुष्टी केली आहे आणि तो पॅरिस पॅरालिम्पिक खेळांना मुकणार आहे, असे प्रशासक मंडळाने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे. ‘1 मार्च, 2024 रोजी क्रीडा लवादाच्या डोपिंगविरोधी विभागाला भगत हा 12 महिन्यांत तीन वेळा ठावठिकाणा स्पष्ट करण्यात अपयशी ठरल्याचे आणि त्याने त्यामुळे अँटी-डोपिंग नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळले होते.
‘एसएल3’ गटातील सदर 36 वर्षीय खेळाडूने म्हटले आहे की, तो या निर्णयामुळे दु:खी आहे आणि हा तांत्रिक त्रुटीचा परिणाम आहे. हा माझ्यासाठी अत्यंत कठीण निर्णय आहे. मी ‘वाडा’चा आदर करतो. मला समजते की, त्यांनी सर्व खेळाडूंसाठी एक मर्यादा रेषा आखून दिलेली आहे. परंतु तांत्रिक कारणांमुळे एखाद्यावर बंदी घालणे योग्य नाही’, असे भगत याने म्हटले आहे.
‘कोणत्याही प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केल्याची ही समस्या नाही, ठावठिकाणा स्पष्ट न झाल्याचा हा मुद्दा आहे. त्यासंदर्भातील चाचणी मला दोनदा चुकली, कारण मी वेगळ्या ठिकाणी होतो. पण माझ्याकडे तिसऱ्यांदा तपशील सादर करण्याचे सर्व पुरावे आहेत. पण त्यांनी माझे अपिल स्वीकारले नाही. हे माझ्यासाठी मोठे नुकसान आहे. मी पॅरिससाठी तयारी करत होतो. मी पदक विजेता ठरलो असतो’, असे भगत पुढे म्हणाला. त्याने या निर्णयाविरोधात सीएएस अपिल विभागाकडे दाद मागितली होती, परंतु गेल्या महिन्यात ते फेटाळण्यात आले.









