प्रशांत किशोर यांच्याकडून घोषणा
वृत्तसंस्था/ पाटणा
प्रशांत किशोर (पीके) यांच्या ‘जनसुराज’ पक्षाला सोमवारी राष्ट्रीय अध्यक्ष मिळाला. उदय सिंह उर्फ पप्पू सिंह यांना पहिले राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले आहे. प्रशांत किशोर यांनी सोमवार, 19 मे रोजी पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. उदय सिंह यांची कोअर कमिटीच्या सदस्यांनी एकमताने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली आहे.
उदय सिंह उर्फ पप्पू सिंह हे पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष असतील, असा निर्णय जनसुराज पक्षाच्या 150 सदस्यांच्या कोअर कमिटीने बहुमताने नव्हे तर एकमताने निर्णय घेतल्याचे किशोर यांनी जाहीर केले. पप्पू सिंह हे पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून दोनदा भाजपचे खासदार राहिले आहेत. त्यांनी 2019 मध्ये भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवली नसली तरी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या पप्पू यादवला पाठिंबा दिल्यामुळे पप्पू यादव पूर्णिया येथून अपक्ष म्हणून निवडणूक जिंकले.
काँग्रेसपासून वेगळे झालेले पप्पू सिंह काही काळापासून जनसुराज पक्षासोबत उघडपणे दिसून येत आहेत. जनसुराज पक्षाच्या पदयात्रेदरम्यान ते प्रशांत किशोर यांच्या संपर्कात आल्यापासून ते ‘जनसुराज’ला मदत करत आहेत. प्रशांत किशोर पाटण्यामध्ये ज्या बंगल्यामध्ये राहतात तो ‘शेखपुरा हाऊस’ पप्पू सिंह यांचाच आहे. या बंगल्याच्या एका भागात पप्पू सिंह देखील राहतात. तर याच बंगल्यात एका बाजुला जनसुराज पक्षाचे कार्यालय आहे.
बिहारमध्ये नवे राजकीय समीकरण
माजी खासदार पप्पू सिंह हे जनसुराज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याने बिहारच्या राजकारणात एका नवीन समीकरणाची सुरुवात होऊ शकते. त्यांचा राजकीय अनुभव आणि लोकप्रियता पाहता हा बदल पक्षासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. पक्षाच्या रणनीतीत बदल होण्याची शक्यताही आहे. प्रशांत किशोर यांच्यासोबत मिळून पप्पू सिंह बिहारच्या राजकारणात एक नवीन वळण सुरू करू शकतात.









