सुपारी खून प्रकरणातील मारेकऱ्यांना अटक : बापानेच काढला काटा, केवळ 24 तासांत दोघांच्या मुसक्या आवळल्या
बेळगाव : कुटरनट्टी, ता. सौंदत्तीजवळील डोंगरावर खून झालेल्या तरुणाची ओळख रक्ताने माखलेल्या एका कागदामुळे पटविण्यात आली. कागद वाळल्यानंतर त्यावर एक मोबाईल क्रमांक लिहिलेला होता. त्या क्रमांकावरून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. 20 ऑगस्ट रोजी सकाळी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला होता. संगमेश मारुती तिगडी (वय 35) रा. बैलहोंगल याचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगोडचे पोलीस निरीक्षक आय. एम. मठपती व त्यांच्या सहकाऱ्यांनी खुनाच्या घटनेनंतर केवळ 24 तासांत दोघा मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मंजुनाथ शेखप्पा होंगल (वय 42), अडिवीश दुंडाप्पा बोळेतीन (वय 35) दोघेही रा. हिरेकोप्प यांना अटक करण्यात आली आहे. संगमेशचे वडील मारुती तिगडी यांनीच सुपारी देऊन आपल्या मुलाचा काटा काढल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मारुतीला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्याला अद्याप अटक झाली नाही.
मोबाईल क्रमांकामुळे अडकले
खून झालेल्या संगमेशच्या खिशात रक्ताने माखलेला एक कागद आढळला होता. पोलिसांनी घटनास्थळावर पुरावे गोळा करताना तो कागद ताब्यात घेऊन उन्हात वाळवला. त्यानंतर त्या कागदावर एक मोबाईल क्रमांक लिहिलेला आढळून आला. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तो संगमेशच्या कुटुंबीयांचा असल्याचा आढळून आले. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटली. त्याचा भाऊ महेश तिगडीने मृतदेह ओळखला. सुपारी घेणाऱ्या दोन्ही आरोपींनी संगमेशला मोटारसायकलवरून अंकलगी येथील श्री लक्ष्मी वाईन्सला नेऊन त्याला दारू पाजली. त्यानंतर कुटरनट्टीच्या डोंगरावर त्याचा खून करण्यात आला. पोलिसांनी हे तिघेजण मोटारसायकलवरून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. मुरगोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.









