औंध :
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतात पाणी साचून राहिल्याने पपईच्या झाडांच्या मुळ्या कुजून बडी (ता. खटाव) येथील दोन शेतकऱ्यांच्या पपई बागेचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिलेली अधिक माहिती अशी की गेल्या आठवड्यात उन्हाळी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. संततधार पावसामुळे राने उफाळली. बडी (ता. खटाव) येथील पपई उत्पादक शेतकरी सुनील जिजाबा येवले आणि अनिल मारुती सुर्यवंशी यांच्या पपई बागेचे मोठे नुकसान झाले. धुव्वाधार पावसाने पपईच्या बागेत पाणी साठून राहिल्यामुळे मूळ्या कुजून गेल्या आहेत. मूळ्या कुजल्यामुळे पपईची पाने सुरकतून बाळायला लागली आहेत. सुनील येवले यांच्या गट नंबर ६०४ मधील तीस गुंठे बागेची हानी झाली असून अंदाजे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच अनिल सुर्यवंशी यांच्या गट नंबर ५७७ मधील ३० गुंठे बाग पाण्यामुळे सुकायला लागली आहे त्यांचे देखील ७० ते ८० हजाराचे नुकसान झाले आहे. कृषी सहायक काळे यांनी भेट देऊन पाहणी केली. महसूल अधिकारी संदीप काटकर यांनी नुकसान झालेल्या बागेची पाहणी करून पंचनामा केला. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.








