वृत्तसंस्था / सिनसिनॅटी (अमेरिका)
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय सिनसिनॅटी खुल्या 1000 दर्जाच्या मास्टर्स टेनिस स्पर्धेत जस्मिन पाओलीनी आणि पोलंडची इगा स्वायटेक यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.
या स्पर्धेत पहिल्यांदाच पाओलीनीने अंतिम फेरी गाठली आहे. तिने उपांत्य फेरीच्या सामन्यात रशियाच्या व्हेरोनिका कुडेरमेटोव्हाचा 6-3, 6-7 (2-7), 6-3 अशा सेट्समध्ये पराभव केला. इटलीच्या पाओलीनीने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत डब्ल्यूटीए टूरवरील 1000 दर्जाच्या स्पर्धेत दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. आता पाओलीनीची अंतिम फेरीतील गाठ पोलंडच्या इगा स्वायटेकशी होणार आहे.
पोलंडच्या इगा स्वायटेकने उपांत्य फेरीच्या सामन्यात इलिना रायबाकिनाचा 7-5, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. विम्बल्डन विजेत्या स्वायटेकने उपांत्य लढतीमध्ये पहिला सेट 7-5 असा जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये तिला रायबाकिनाकडून फारसा प्रतिकार झाला नाही. स्वायटेकने या लढतीमध्ये 13 पैकी 10 गेम्स जिंकून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. स्वायटेकचा रायबाकिनावरील हा सलग चौथा विजय आहे.









