शहरातला उंच सखलपणा व खजिन्याची उंची याचा शास्त्रीय मेळ घालून पाण्याचा खजिना बांधला
By : विनोद सावंत
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील पाण्याचा खजिन्याची वाटचाल दीडशे वर्षाकडे सुरू आहे. हा खजिना शिवाजी पेठ, मंगळवार पेठेसह संलग्न असणाऱ्या उपनगरातील सुमारे एक लाख नागरिकांची पाण्याची तहान भागविण्याचे काम अखंडपणे करत आहे. विशेष म्हणजे पाण्याच्या खजिनानंतर उभारलेल्या काही टाक्यांना गळती लागली. नवीन टाकी उभारण्याची वेळ आली. परंतू दीडशे वर्ष होत आले पाण्याच्या खजिन्याला गळती लागण्याचा प्रकार झालेला नाही.
कात्यायनी डोंगराच्या पायथ्याला असलेला पाण्याचा प्रवाहाचा उपयोग करून कळंबा येथे 1873 मध्ये तळे बांधले. या पाण्याला बांध घातला. नैसर्गिक उताराच्या आधारे दगडी पाटातून पाणी नंगविली दर्ग्यापर्यंत आणले. मेजर वॉल्टर ड्युकर यांनी ही योजना आणली. त्यांनी 2 लाख 94 हजार 500 गॅलन पाणी साठा करणारी टाकी नंगीवली दर्गाजवळ 1877 मध्ये बांधून पूर्ण केली. त्यालाच पाण्याचा खजिना म्हटले जाते.
शहरातला उंच सखलपणा व खजिन्याची उंची याचा शास्त्रीय मेळ घालून पाण्याचा खजिना बांधला. वीज पंपाच्या आधाराशिवाय कळंबा तलावातील पाणी केवळ नैसर्गीक उताराने शहरात सर्वत्र पोहचेल, अशी ही योजना होती. कळंबा तलाव ते पाण्याचा खजिना असे दगडी बांधकामाचे पिलाराने हे पाणी आणले. सध्या येथून पाणीपुरवठा बंद असला तरी पुईखडीतून येणारे पाणी पाण्याच्या खजिना आणि शेजारीच असणाऱ्या भूमिगत शालिनी टाकीत सोडले जाते. यातून शिवाजी पेठ, मंगळवार पेठेतील सात ते आठ प्रभागात विविध वेळेनुसार पाणी पुरवठा केला जाते. 25 ते 30 हजार कनेक्शन असून सुमारे 1 लाख नागरिकांना पाणीपुरवठा होतो.
नवीन टाक्या खराब, 148 वर्षांचा पाण्याचा खजिना सुस्थितीत
पाण्याच्या खजिनेचे उत्कृष्ट बांधकाम झाले असून गळती लागण्याचा प्रकार बहुदा झालेला नाही. येथील पत्रे बदलले. दुसरीकडे यानंतर बांधलेल्या कावळा नाका, आपटेनगर पाण्याच्या टाकींना गळती लागली. आपटेनगरची टाकी तर नव्याने बांधावी लागली.
अंबाबाईच्या भक्ताकडून 3 लाख
कोल्हापुरातील पाण्याची समस्या पाहून करवीर निवासिनी अंबाबाईवर श्रध्दा असलेल्या पुण्याच्या बाबूराव केशव ठाकूर यांनी पाण्याच्या खजिना उभारण्यासाठी 3 लाख दिले. कोनशिलेवर त्यांच्या नावाचा उल्लेख आहे.
पाणीपुरवठा होणार परिसर
शिवाजी पेठेतील वेताळ माळ तालीम, फिरंगाई तालीम, खरी कॉर्नर, न्यू महाद्वार रोड, टिंबर मार्केट तसेच मंगळवार पेठेतील नंगिवली चौक परिसर, शाहू बँक परिसर, कोळेकर तिकटी, राम गल्ली, भक्तीपुजानगर, गजानन महाराज नगर, संभाजीनगर परिसर, वारे वसाहत
ऐतिहासिक ठेव्याच्या जतन, संवर्धनाची गरज
पाण्याच्या खजिनाच्या छत खराब झाले होते. ते महापालिकेने बदलेले आहे. परंतू खजिन्याच्या परिसरात झाडे–झुडपे झाली असून यामुळे टाकीला धोका निर्माण होऊ शकतो. ही झाडे–झुडपे काढणे आवश्यक आहे. येथून पुढेही पाण्याचा खजिनाचा वापर होण्यासाठी याचे जतन, संवर्धनाची गरज आहे.
कार्यालय धोकादायक, मद्यपींचा वावर
पाण्याचा खजिन्याच्या ठिकाणी मद्यपींचा वावर असतो. पोलिसांनी यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच शाखा अभियंता यांच्या कार्यालयाची दुरवस्था झाली. याचा स्लॅब कोसळत असून इमारतीला धोका निर्माण झाला आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी ही इमारत नव्याने उभारण्याची गरज आहे.
- शालिनी टाकी– अडीच लाख लिटर
- पाण्याचा खजिना-10 लाख लिटर
- नवीन उंच टाकी -15 लाख लिटर








